अभिनेत्री विद्या बालन नेहमीच चौकटीबाहेरील कथानकांना न्याय देते. अशाच अनोख्या कथानकासह ती प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली असून, ‘तुम्हारी सुलू’ असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातून विद्या एका सर्वसामान्य गृहिणीच्या रुपात दिसेल. पण, त्यातही तिचा हटके अंदाज प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ‘बन जा तू मेरी रानी’ हे पंजाबी शैलीतील गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले. या गाण्याची जादू ओसरत नाही तोच, ‘तुम्हारी सुलू’मधील आणखी एक गाणे प्रदर्शित करण्यात आले असून, त्यामध्ये विद्याचा खोडकर अंदाज पाहायला मिळत आहे.
‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटात अभिनेत्री श्रीदेवीवर चित्रीत झालेल्या, प्रचंड गाजलेल्या ‘हवा हवाई’ या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन ‘तुम्हाही सुलू’मध्ये साकारण्यात आले आहे. तनिष्क बागाचीने या गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन सादर केले असून, ‘पार्टी साँग’ प्रकारात येणाऱ्या या गाण्यात विद्या धमाल करताना दिसते. नेहा धुपिया, आरजे मलिष्कासुद्धा या गाण्यात झळकत असून, विद्यासह त्यासुद्धा या गाण्यावर थिरकल्या आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातील गृहिणी कामाच्या निमित्ताने मिळालेल्या संधीचे सोने करते आणि त्यानंतर पार्टी करण्यासाठी गेल्यावर ती ज्याप्रमाणे सर्व पाश तोडून प्रत्येक क्षणाचा आनंद घेते याचे सुरेख चित्रण गाण्यातून करण्यात आले आहे.
वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा
सुरेश त्रिवेदी दिग्दर्शित ‘तुम्हारी सुलू’ गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. यातून विद्या ‘लेट नाइट रेडिओ शो’ची धुरा सांभाळणाऱ्या आरजेच्या रुपात झळकणार आहे. हा चित्रपट आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. ते कारण म्हणजे आरजे मलिष्का. नेहमी आपल्या आवाजाने आणि प्रचंड उत्साहाने मुंबईकरांना जागी करणारी ही आरजे ‘तुम्हारी सुलू’च्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्येही या चित्रपटाविषयी बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे.