दिलीप ठाकूर
गाण्याचा मुखडा ऐकताक्षणीच अनेकजण पुढे गायलेही असतील…
एक चाँद का टुकड़ा रहता है
अफसोस ये है कि वो हम से
कुछ उखड़ा उखड़ा रहता है
ज्योती स्वरूप दिग्दर्शित ‘पडोसन’ (१९६८) मधील या गाण्याची बरीच वैशिष्ट्ये आहेत. या गाण्याचे आणि अर्थातच या चित्रपटाचेही हे पन्नासावे वर्ष आहे. रसिकांच्या चक्क चार पिढ्या ओलांडून देखील हा चित्रपट मनसोक्त मनमुराद आनंद देतो. यु ट्युबवर पाहू शकता. गाण्याचे बोल ऐकून वा गुणगुणताना हे खिडकीतील गाणे आहे आता हिंदी चित्रपटातील सर्वाधिक लोकप्रिय दोन खिडकी गाणी म्हणजे एक तर हे आणि दुसरे म्हणजे, विजय आनंद दिग्दर्शित ‘जॉनी मेरा नाम’ (१९७०) मधील ‘पलभर के लिए कोई हमे प्यार कर ले…’ तर ‘पडोसन’च्या गाण्यात पलिकडच्या इमारतीत राहणार्या बिंदूला (सायरा बानू) इम्प्रेस करणार्यासाठी इकडच्या खिडकीतून भोला (सुनील दत्त) गातो.
जिस रोज़ से देखा है उस को
हम शमा जलाना भूल गए
दिल थाम के ऐसे बैठे हैं
कहीं आना जाना भूल गए
अब आठ पहर इन आँखों में वो चंचल मुखड़ा रहता है
भोला जरी गात असला तरी तो फक्त ओठ हलवतोय. खरं तर पाठीमागून विद्यापती म्हणजेच गुरु (किशोरकुमार) गातोय आणि या दोघांना बनारसी (मुकरी), कोलकतीया (केश्तो मुखर्जी), लाहोरी (राज किशोर) त्याना डबा अथवा झाडू वाजवत साथ देताहेत. ही अगदी भन्नाट विनोद निर्मिती आहे. तिकडे बिंदू अर्थात सायरा बानू कधी पुस्तकात डोकं खुपसते आणि मधूनच चोरट्या नजरेने भोलाकडे पाहतेय. तिच्या या प्रतिसादाने भोला व गुरु अधिकच मोकळेपणानं गाऊ लागतात.
बरसात भी आकर चली गयी
बादल भी गरज कर बरस गए
पर उस की एक झलक को हम
ऐ हुस्न के मालिक तरस गए
कब प्यास बुझेगी आँखों की दिनरात ये दुखडा रहता है
पलिकडील इमारतीत राहणार्या एखाद्या आवडलेल्या युवतीचे घर व त्याची खिडकी अगदी अशीच असावी असे मनोमन वाटणारे प्रेमवीर समाजात खूप असतील. त्याना हे गाणे आपलेसेच वाटावे. राजेंद्र कृष्ण यांच्या या गीताला राहुल देव बर्मनचे संगीत. यात आणखीन एक वैशिष्ट्य आहे. येथे हे गाणे अभिनेता किशोरकुमारवरही आहेच ( सुनील दत्त फक्त त्यावर अभिनय करतोय आणि सायराचे लक्ष वेधतोय. हे सगळेच पटकथेनुसार) पण सुनील दत्तला पार्श्वगायक किशोरकुमारचा आवाज हेही अप्रत्यक्षरित्या आहेच. साठच्या दशकात सुनील दत्त पडद्यावर कायमच मोहम्मद रफी, मुकेश, महेन्द्र कपूर व तलत मेहमूद यांच्याच आवाजात गायलाय. ‘पडोसन’नंतर मात्र सत्तरच्या दशकात सुनील दत्तला किशोरकुमारचे पार्श्वगायन अधिक लाभले. गाणे मस्त अनुभव देते. ‘पडोसन’ची निर्मिती एन. सी. सिप्पी व मेहमूद यांची आहे. मेहमूद स्वतः अष्टपैलू विनोदवीर असल्याने आपल्या प्रतिमेनुसार त्याने हा चित्रपट निर्माण केला. काही वर्षांनी तो दिग्दर्शकही झाला.