प्रियकराकडून प्रेयसीच्या सौंदर्याची तारीफ करणारी गाणी हिंदी चित्रपटातून वर्षानुवर्ष आपण पाहत आलोय. पण त्यात फिरोज खानची असे गाणे सादर करण्याची शैलीच वेगळी. तुम्हाला कदाचित ‘क्या खूब लगती हो…..’ हे त्याने हेमा मालिनीला उद्देशून साकारलेले ‘धर्मात्मा ‘ (१९७५) मधील गाणे आठवले असेल. पण तत्पूर्वीच असित सेन दिग्दर्शित ‘सफर’ (१९७०) मध्ये शर्मिला टागोरची मर्जी संपादन करण्यासाठी तो काहीशा त्याच पठडीत गायला,
जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे
तुम दिन को अगर रात कहो, रात कहेंगे
एका आलिशान उघड्या गाडीतून फिरोज खान व शर्मिला टागोर छान फिरायला निघालेत, फिरोजच्या हाती स्टिअरिंग आहे. ते सांभाळत तो शर्मिलाकडे पाहत पाहत गातोय. ती त्याच्या स्तुतीचा छान आनंद घेतेय.
देते ना आप साथ तो मर जाते हम कभी के
पूरे हुए हैं आप से अरमान जिन्दगी के
शर्मिला टागोर खट्याळ हसतच त्याला आणखीन मोकळेपणाने गायची जणू प्रेरणा देते. गाण्यात निसर्गाचाही नकळत वापर झालाय. गाडीसोबत गाण्याचा वेगही उत्तम राखलाय. ते फार महत्त्वाचे असते.
चाहेंगे, निभाएँगे, सराहेंगे आप ही को
गाडी एका बगिच्यातील आकर्षक घरासमोर थांबते. फिरोज खान शर्मिला टागोरला उचलून घेत आत जातो. या एवढ्याश्या प्रसंगातही प्रणय छटा व्यक्त होते हे या दोघांसह दिग्दर्शकाचेही वैशिष्ट्य. काही क्षण सूर्यास्त. लगोलग एका कड्यावर दोघेही नवीन वस्रात सहवासाचा आनंद घेताना दिसतात. इंदिवरचे गीत, कल्याणजी- आनंदजीचे संगीत व मुकेशचा आवाज हा सगळाच सूर छान जमून आलेला व त्यात हे नेटके सादरीकरण.
आँखों में नम है जब तक देखेंगे आप ही को
फिरोज खान कायम ‘लेडी किलर ‘ हीरो म्हणून ओळखला गेला. हा चित्रपट राजेश खन्ना गंभीर आजाराने त्रस्त आहे या सूत्राभोवतीचा! यात कोणत्याही स्टाईलला तसा वाव नव्हता . पण फिरोज खानच्या मर्दानी व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडणारच ना? शर्मिला टागोरही छान हसत, मध्येच हलकेसे काही बोलत गोड दिसलीय. अर्थात हे गाण्याची गरज म्हणूनही.
जो तुमको हो पसंद….
जे जे तुला आवडेल ते ते करायला मी तयार आहे… प्रेमातील ही प्रियकराकडून कोणत्याही प्रेयसीला आवडणारी कल्पना. गाणे म्हणूनच तर मस्त जमून आलंय.
दिलीप ठाकूर