प्रेयसीच्या स्वभाव व सौंदर्याची प्रियकराकडून ‘जी भरके तारीफ’ करणारी किती तरी चित्रपट गीते प्रत्यक्षातही एखाद्या प्रेमिकास सहजच गुणगुणावीशी वाटतात.
चंदन सा बदन, चंचल चितवन
धीरे से तेरा ये मुस्काना
मुझे दोष न देना जगवालों
हो जाऊँ अगर मैं दीवाना
रसिकांची एक पिढी एव्हाना कृष्ण-धवल अर्थात ‘ब्लॅक अँड व्हाईट’ चित्रपटाच्या काळात गेलीच असणार आणि नंतरच्या पिढीलाही हे गाणे खूप जवळचे वाटतेय कारण ते कोणत्याही काळातील प्रियजनाना आपलेसे करणारे आहे. एका प्रशस्त बगीच्यामध्ये नायक (मनिष) ते नायिकेला (नूतन) उद्देशून गातोय. पण त्याच्यापेक्षाही तीच त्या स्तुतीचा आनंद घेतेय हे जाणवते. नूतन कटाक्षातून जास्त बोलते याचा प्रत्यय गोविंद सरय्या दिग्दर्शित ‘सरस्वतीचंद्र ‘ (१९६८) च्या या गाण्यातूनही येतोय.

ये काम कमान भवें तेरी
पलकों के किनारे कजरारे
माथेपर सिंदूरी सूरज
होठों पे दहकते अंगारे

रात्रीची वेळ आणि नायक नायिकेच्या सुंदर व्यक्तिमत्वाचे कौतुक करतोय अशा वेळेस चंद्राचीही साक्ष हवीच. अशातच तो तिच्या केसातून हात फिरवताना ती शहारते. अधून मधून प्रणयाच्या मूर्तीचाही प्रतिकात्मक वापर आहेच. महत्त्वाचे आहे ते, नायकाने असे भरभरून प्रेम व्यक्त करतानाही नायिकेचे संकोचून जाणे. पती-पत्नीमधील नात्यातही पन्नास वर्षांपूर्वी जवळीकेतही स्त्रीसुलभ दुरावा असे.

किसी और को शायद कम होगी
मुझे तेरी बहोत जरुरत है
पहले भी बहोत मैं तरसा हूँ
तू और न मुझ को तरसाना

नूतनचे आनंदातही लाजणे कमालीचे लाघवी असल्याचा छान प्रत्यय येत चाललाय. मनिषचे अस्तित्व काहीसे दुय्यम ठरते. इंदिवरच्या गीतलेखनातून असे एक अप्रतिम काव्य घडलयं. कल्याणजी-आनंदजीचे संगीत व मुकेशचे पार्श्वगायन यानी त्यात आणखीन रंग भरलाय. इतक्या वर्षानंतरही गाण्यातील गोडवा कायम आहे आणि आजच्याही पिढीला ते आपलसं वाटतेय हे तर केवढे कौतुकास्पद!
दिलीप ठाकूर