scorecardresearch

दास्तान-ए-मधुबाला भाग- ५

त्या घटनेमुळे तिच्या नावाला ग्लॅमर इतकाच आदरही प्राप्त झाला

दास्तान-ए-मधुबाला भाग- ५
मधुबाला

लावण्यवती मधुबालाने वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत ७ सिनेमांत, १५ व्या वर्षापर्यंत १५ सिनेमांत आणि १६ पूर्ण होईपर्यंत २५ सिनेमांत काम केलं. १६ वर्ष संपेपर्यंत ‘महल’मुळे ती लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचली होती. एवढ्या यशानंतरही मधुबालाचे पाय जमिनीवरच होते. तिच्या वतीने सगळे व्यवहार तिचा बाप अताउल्लाखान पाहत असे. असं म्हणतात की अपयश पचवणं सोपं असतं पण यश पचवायला फार मोठा संयम लागतो. चौथी पास खानाला एकेकाळी दोन वेळ अन्नाची शाश्वती नव्हती, पण आता मधुबालाच्या चलतीच्या काळात झोपडपट्टीतून पेडर रोडवरच्या फ्लॅटमधील वास्तव्य, शोफर ड्रिव्हन कार आणि दररोजचं चटपटीत खमंग मसालेदार मांसाहारी खाणे. यामुळे खानाचे पाय मात्र जमिनीवर राहिले नाही.

महलच्या यशानंतर त्यानं मधुबालाचं मानधन लाखांच्या घरात नेलं. वाट्टेल तेवढी किंमत द्यायला तयार होणारा सिनेमा करायचा, एवढा एकच निकष सिनेमाला लावत त्याने कथा, पटकथा, नायक, निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार या कशाचीही चौकशी न करता बेकसूर, हंसते आँसू, परदेस, निराला, निशाना हे सिनेमे मोठ्या रकमा घेत स्वीकारले. पण यामुळे मधुबालाचं वेळेचं नियोजन बाळगळत होतं. तिनं खानाला समजावत सगळीकडे वेळेवर पोचता येईल अशा प्रकारच्या तारखा आणि वेळा सर्व निर्मात्यांना द्यायला लावल्या. मधुबालाच्या वक्तशीरपणामुळे तिला सिनेमात घ्यायला निर्मात्यांमधे स्पर्धा सुरु झाली होती. त्यात आणखी एक घटना अशी घडली ज्यामुळे मधुबालाच्या सौंदर्याइतकाच तिच्या कृतज्ञ आणि प्रमाणिक स्वभावाचा बोलबाला झाला.

रणजित स्टुडिओच्या ६ सिनेमात बेबी मुमताज या नावाने बालकलाकार म्हणून मधुबालाने काम केलं होतं. हे ६ सिनेमे फ्लोअरवर असताना मधुबालाच्या आईला १० व्यांदा दिवस गेलेले व कळा सुरु होताच तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले. डाॅक्टरनी सांगितलेलं की तातडीच्या आॅपरेशनअभावी आई व मूल दोघेही दगावण्याचा धोका आहे. आॅपरेशनसाठी २ थे अडीज हजार रुपयांची व्यवस्था तातडीने करायची आवश्यकता होती. खान कुठेतरी लष्करच्या भाकर्‍या भाजायला बाहेर गेलेला. घरातली एकमेव अकाली प्रौढ मधुबाला हिच्यावर जबाबदारी येऊन पडली.

तिनं चंदूलाल शहांना फोन लावला. पण ते बाहेर गेल्याचं कळताच त्यांचा पुतण्या रतिलाल शहाच्या कानावर सगळी हकीगत घातली व पैसे देण्याची विनंती केली. पैसे मिळताच व्याजासकट ती परत करेल असेही तिने मान्य केले. तेव्हा रतिलालनी मुद्दल आणि व्याज विसर, पण कधी हाक मारली तर वेळेला आमच्या सिनेमात काम कर, असं सांगून १० व्या मिनिटाला पैसे माणसाकरवी पोचते केले. वेळीच आॅपरेशन केल्यामुळे पोटातली मुलगी गेली तरी आईला वाचवण्यात डाॅक्टर यशस्वी झाले आणि मधुबाला शहा कुटुंबाची आजन्म ऋणाईत झाली.

महलनंतर १९४९ मध्ये ५ सिनेमांत मधुबाला व्यग्र होती. इकडे चंदूलाल शहा आपल्या रेस, तीन पत्ती जुगार अशा शौकांमुळे कफल्लक झाला होता. तेव्हा एखादा सिनेमा काढून आपण हे दैन्य सुधारू, या विश्वासाने चंदूलालचा पुतण्या रतिलाल काकाच्या मागे लागला. पण खुद्दार व मानी स्वभावाच्या चंदूलालनी कुणापुढेही हात पसरायला नकार दिला. पण रतिलालने कशीबशी सगळी जमवाजमव केली व नायिकेसाठी मधुबालाकडे गेला. आपल्या पडत्या काळात लेकीला संधी देणार्‍या शहाला पण खानने लाखांच्या मानधनाचा आकडा सांगितला. ते ऐकून रतिलाल निराश होऊन परत गेला.

संध्याकाळी खानकडून ती हकीगत समजताच मधुबाला मनोमन अत्यंत खजील झाली व खानाला समजावण्याच्या भानगडीत न पडता ती दुसर्‍या दिवशी त्याच्या अपरोक्ष रतिलालला जाऊन भेटली व झाल्या प्रक्राराबद्धल माफी मागत त्याच्या सिनेमात विना- मोबदला काम करण्याची तयारी दर्शवली. रतिलालला मधुबालाची कृतज्ञता पाहून भरून आलं. पण देणार्‍या हातांना घ्यायची सवय नसते ना… त्याचप्रमाणे रतिलालनी मधुबालाला २५ हजार रुपये दिले व मधुबालाचे नाव पुढे करत देव आनंदला १० हजार रुपयांमध्ये नायक बनवले. मधुबालाच्या कृतज्ञतेला सलाम म्हणून सिनेमालाही मधुबाला हेच नाव दिले गेले.

१९५० मध्ये मधुबालाचे बेकसूर, हँसते आँसू, परदेस, निराला, निशाना आणि मधुबाला हे ६ सिनेमे आले. पण यातला एकही विशेष चालला नाही. मात्र मधुबाला सिनेमामागची हकीगत सिनेसृष्टीत पसरल्यामुळे तिच्या नावाला ग्लॅमर इतकाच आदरही प्राप्त झाला. खानाच्या अवाजवी मागण्यांकडे दुर्लक्ष करून मधुबाला आपल्या सिनेमात असावी असं नामांकीत निर्मात्यांनाही आता वाटू लागलं होतं.

उद्यापासून आपण जाणून घेणार आहोत मधुबालाच्या काही प्रमुख सिनेमांविषयी. यापैकी एका लेखामधे मुगल-ए-आझम वगळता तिच्या इतर हिट सिनेमांचा धावता आढावा घेणार आहोत. मुगल-ए-आझम हा मधुबालाच्या कारकीर्दीतील अत्युच्च अभिनय, नृत्य व सौंदर्याने परिपूर्ण असा सिनेमा होता. कथा, पटकथा, संवाद, गीत, संगीत, अभिनय, फोटोग्राफी या सगळ्याच बाबतीत हिंदी सिनेसृष्टीतील हा एक सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे. त्यामुळे आता भेटूया पुढच्या भागात.

– उदय गंगाधर सप्रे

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-02-2018 at 12:48 IST

संबंधित बातम्या