नवीन वर्षाच्या सुरुवातीला बॉलिवूड जगतात शोककळा पसरली आहे. इस्तांबूल येथील नाईट क्लबमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये बॉलिवूडचे निर्माते अबीस रिझवी यांचा मृत्यू झाल्यामुळे बॉलिवूड जगतामध्ये शोककळा पसरली आहे. इस्तंबूल येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये ३९ नागरिकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये दोन भारतीय नागरिकांचा समावेश होता. यामध्ये अबीस रिझवी यांनी प्राण गमावले होते.

 

बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन, अभिनेता रणदीप हुड्डा, दिग्दर्शक मधुर भांडारकर तसेच अभिनेत्री पूजा बेदी यांनी अजीज यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. धक्कादायक घटनेमुळे मी माझा चांगला मित्र गमावला आहे. अजीब नेहमीच आठवणीत राहील, असे ट्विट दिग्दर्शक मधुरकर भांडारकर यांनी केले आहे. पूजा बेदी हिने अजीब यांच्या निधनाचे दुख व्यक्त करताना त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. आयुष्य फारच छोटे आहे. असे सांगत रणदीप हुड्डाने या घटनेबद्दल दुख व्यक्त केले. निर्माता अबीस यांच्यावरील प्रेम व्यक्त करत रविनाने त्यांना श्रद्धाजली वाहिली.

तुर्कीमधील इस्तंबूल शहरातील नाईट क्लबमध्ये नवीन वर्षाच्या स्वागत सोहळ्यात दहशतवाद्यांनी हल्ला झाला होता. या हल्ल्यात ३९ जण ठार झाले. तर अनेक जण जखमी झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये १६ विदेशी नागरीक असल्याची माहिती इस्तंबूलचे गव्हर्नर वासीप शाहीन यांनी दिली होती. त्यात रिझवी आणि खुशी शहा या दोन भारतीयांचा समावेश होता.  एका नाईट क्लबमध्ये पार्टी सुरु असताना सांताक्लॉजच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी प्रथम एका पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी पार्टीत सहभागी झालेल्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात अनेकांचा जागीच मृत्यू झाला होता.