सुपरस्टार रजनीकांत म्हणजे प्रत्येक कलाकारासाठी दैवतच. आपल्या अभिनयाने आणि अनोख्या शैलीने प्रेक्षकांच्याच नव्हे, तर सेलिब्रिटींच्याही मनात गुरुतुल्य स्थान मिळवलेल्या या अभिनेत्याच्या लोकप्रियतेविषयी सांगावे तितके कमीच. यशाच्या शिखरावर असलेल्या रजनीकांत यांना अनेकांनीच गुरुस्थानी मानले आहे. पण, खुद्द रजनीकांत यांचे गुरु कोण, हे तुम्हाला माहितीये का? अभिनय क्षेत्रात आपली छाप पाडणाऱ्या या सुपरस्टारच्या आध्यात्मिक गुरुच्या नावाचा उलगडा ‘इंडिया टुडे’ने केला आहे.
उत्तर भारतातील पर्वतरांगांमध्ये त्यांच्या गुरुचे स्थान असून, खुद्द रजनीकांत तेथे मानसिक शांतता आणि गुरुंची साधना करण्यासाठी जातात, असे ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात प्रसिद्ध करण्यात आले आहे. उत्तराखंडमधील कुमाऊं भागातील अलमोरा जिल्ह्यात त्यांच्या गुरुंची गुहा आहे. महाअवतार बाबा असे त्यांच्या गुरुंचे नाव असून, त्यांच्या कार्याचा उल्लेख योगानंद परमहंस यांनी ‘ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी’ या पुस्तकात केला आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’
दुनागिरी येथे समुद्रसपाटीपासून ५००० फूट उंचीवर असणाऱ्या पर्वतामध्ये ही गुहा असून, ‘योग सत्संग सोसायटी ऑफ इंडिया’तर्फे (YSS) त्या ठिकाणी देखरेख करण्यात येते. पर्वतावरील जंगलामध्ये असलेल्या या गुहेच्या परिसरात एक प्रकारची शांतता असून, वेगळ्याच दुनियेत आल्याची अनुभूती होते. रजनीकांत यांना विश्वनाथन श्री हरी या त्यांच्या उद्योजक मित्राने या ठिकाणाविषयी सांगितले होते. खुद्द विश्वनाथन त्या ठिकाणी १९९८ पासून साधनेसाठी जात आहेत. या ठिकाणाबद्दल माहिती मिळताच रजनीकांत यांनी येथे भेट दिली. त्या आध्यात्मिक स्थळाला भेट दिल्यापासून आपल्या कारकिर्दीत सकारात्मक बदल झाल्याचे खुद्द रजनीकांत यांचेच म्हणणे आहे. त्यांच्या कुटुंबियांमध्येही या गुरुंविषयी बराच आदर असल्याचेही म्हटले जाते.