राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. १७ वर्षांहून अधिक काळ डेट केल्यानंतर दुसरी पत्नी सफीना हुसैनशी का लग्न केलं, याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच घटस्फोटानंतरही पहिली पत्नी सुनीताशी कसं नातं होतं, याबाबतही त्यांनी सांगितलं. हंसल यांनी २०२२ मध्ये सफीनाशी लग्न केलं, त्यांना दोन मुली आहेत. त्यांना पहिल्या पत्नीपासून जय व पल्लव ही दोन मुलं आहेत.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत हंसल यांनी त्यांच्या दोन लग्नाबाबत सांगितलं. दुसरी पत्नी सफीनाबद्दल विचारल्यावर म्हणाले, “आम्ही एकत्र राहत होतो आणि आम्हाला मुलं होती. जणूकाही लग्नसंस्था आमच्या दोघांसाठी नव्हतीच. आपले ग्रंथ (पवित्र ग्रंथ) म्हणतात ‘सबसे उंची प्रेम सगाई’ (प्रेम सर्वांपेक्षा श्रेष्ठ)’. आम्ही एकत्र राहत होतो आणि आम्हाला कधीच लग्न करण्याची गरज वाटली नाही. लग्न म्हणजे काय? आम्ही दोघांनीही आयुष्यात याचा अनुभव घेतला होता. आमच्या दोघांची आधी लग्नं झाली होती.”
हंसल मेहता पहिली पत्नी सुनीतापासून घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेते युसूफ हुसेनची मुलगी सफीनाबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. त्यांना किमया व रेहाना या दोन मुली आहेत. १७ वर्षे एकत्र राहिल्यावर या जोडप्याने २०२२ मध्ये लग्न केलं. या परिस्थितीत मुलांनी कसं जुळवून घेतलं असं विचारल्यावर हंसल यांनी सांगितलं की अनेक वर्षे विभक्त राहूनही त्यांनी सुनीतावर पती म्हणून अंत्यसंस्कार केले. “माझ्या आई-वडिलांनी फक्त माझी आणि माझ्या मुलांची काळजी घेतली नाही, तर त्यांनी सुनीताचीही काळजी घेतली. सुनीताचं माझ्याशी असलेलं नातं कधीच कटुता येऊन संपलं नाही. आम्ही वेगळे झालो होतो, तरी तिचा पती म्हणून मी तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते,” असं हंसल मेहता म्हणाले.
सुनीता व सफीना यांचं एकमेकींशी कसं नातं होतं, याबाबत हंसल यांनी सांगितलं. त्या दोघी मैत्रिणीसारख्या राहायच्या, सुनीताने सफीनाला साडी नेसायला शिकवलं होतं, अशी आठवण त्यांनी सांगितली. “ती जिवंत असताना आम्ही एकमेकांशी बोलायचो. तिची प्रकृती चांगली राहत नव्हती, त्यामुळे जेव्हा तिला काही गोष्टींबद्दल काळजी वाटायची तेव्हा ती माझ्याशी बोलायची. आम्ही आमच्या नात्यात कधीही शत्रुत्व येऊ दिलं नाही. सुनीता आणि सफीना एकमेकांशी खूप बोलायच्या. आम्ही एकदा दिवाळीसाठी पुण्यात संजय गुप्ता यांच्या घरी गेलो होतो, त्यावेळी सुनीताने सफीनाला साडी नेसायला मदत केली होती. सफीनाने नेहमी जय आणि पल्लवला आपली मुलं मानलं. जय सफीनाला त्याची आई म्हणतो,” असं हंसल मेहता म्हणाले.