शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट खूपच चांगला आहे, असं कौतुक प्रेक्षक करत आहेत. ‘जवान’ने पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली. जगभरात ‘जवान’ने ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
बॉक्स ऑफिसवर ‘जवान’ छप्परफाड कमाई करत आहे. चित्रपटातील संवाद, तसेच काही सीन्सची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चाही सुरू आहे. याबरोबरच चित्रपटसृष्टीतील बऱ्याच लोकांनीही शाहरुख खानच्या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. कंगना, करीना, हृतिक ते थेट एसएस राजामौली यांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
आणखी वाचा : “आपण सगळे ढोंगी…” सेक्सविषयी संभाषण न करणाऱ्या भारतीयांबद्दल अनुराग कश्यपचं वक्तव्य चर्चेत
यातील “बेटे को हाथ लगानेसे पेहले बापसे बात कर” हा डायलॉग चांगलाच गाजत आहे. हा डायलॉग समीर वानखेडे यांना उद्देशून असल्याचंही काही लोकांनी म्हंटलं. अशा या दमदार डायलॉगची रेलचेल आपल्याला जवानमध्ये पाहायला मिळत आहे. अशातच आता शाहरुखच्या नव्या डायलॉगची चर्चा होऊ लागली आहे. नुकतंच या चित्रपटात साकारलेल्या विक्रम राठोड या पात्राची झलक शाहरुखने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.
या व्हिडीओ क्लिपमध्ये मागे ऐकू येणाऱ्या डायलॉगने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख दमदार अॅक्शन करताना दिसत आहे. हे सुरू असताना जो डायलॉग ऐकू येतो तो असा – “वो अंत है तो मै काल हूं, वो तीर है तो मैं ढाल हूं…हूं पुण्य पाप से परे, चिताकी वो आग हूं, जो ना टले वो श्राप हूं… मैं तुम्हारा बाप हूं!” सोशल मीडियावर शाहरुखने शेअर केलेल्या या प्रोमोची जबरदस्त चर्चा होत आहे, अन् हा डायलॉगही यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. हा डायलॉग चित्रपटात नसून केवळ या नव्या प्रोमोमध्येच आपल्याला ऐकायला मिळत आहे.
‘जवान’ हा बॉलिवूडमधील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला आहे. याआधी हा रेकॉर्ड शाहरुखच्या ‘पठाण’ आणि सनी देओलच्या ‘गदर २’च्या नावे होता. या दोघांना मागे टाकत ‘जवान’ने बाजी मारली आहे. या चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा व विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय यामध्ये प्रियामणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोग्रा, आलिया, गिरीजा ओक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय दीपिका पदुकोणचा कॅमिओदेखील आहे.