मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज दिग्गजांचे प्रवेश शिवसेनेत होणार आहेत. अभिनेत्री करीना कपूर, करीश्मा कपूर या दोन्ही अभिनेत्री शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, हाती भगवा झेंडा घेणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. मुंबई काँग्रेसचा एक बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार अशीही माहिती मिळते आहे. हे नेते दुसरे तिसरे कुणीही नसून संजय निरुपम आहेत अशीही चर्चा आहे. संजय निरुपम यांनी बुधवारीच उद्धव ठाकरेंवर टीका करत नाराजी व्यक्त केली होती. अभिनेता गोविंदाने काही वेळापूर्वीच भगवा झेंडा हाती घेत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आता त्यापाठोपाठ करिश्मा कपूर आणि करीना कपूर या दोघीही शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर वर्षा बंगल्यावर गेल्या आहेत. या दोन्हीही अभिनेत्रींचा राजकारणात प्रवेश होणार असल्याच्या चर्चा यामुळेच रंगल्या आहेत. कपूर कुटुंबीयांकडून याबाबत भाष्य करण्यात आलेलं नाही. आत्तापर्यंत कपूर घराण्यात कुणीही राजकारणात प्रवेश केलेला नाही. अशात जर या दोघींनी शिवसेनेत प्रवेश केला तर ही मोठी घडामोड असणार आहे.
लोकसभा निवडणूक आली की अभिनेते, अभिनेत्री विविध पक्षांमध्ये प्रवेश करतात. २००४ मध्ये गोविंदाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता आणि भाजपाच्या राम नाईक यांना हरवलं होतं. आता करीना आणि करीश्मा शिवसेनेत येणार का? आल्या तर त्यांना लोकसभेची जबाबदारी दिली जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.