सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खान हिने ‘केदारनाथ’ चित्रपटाद्वारे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. सारा सोशल मीडियावर सक्रिय असून, अभिनयासह आपल्या वैयक्तिक आयुष्यातील बाबीही ती शेअर करीत असते. अनेकदा ती चुटकुले, शायरी म्हणून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसते.

सारा अली खान तिच्या आईसारखी म्हणजेच अमृतासारखी दिसते हे सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु, नुकताच साराने सोशल मीडियावर एक रेट्रो लूक शेअर केला; ज्यात सारा ही तिची आजी शर्मिला टागोर यांच्यासारखी दिसत आहे असे तिचे चाहते म्हणत आहेत.

हेही वाचा… ट्विंकल खन्नाच्या ‘त्या’ विधानावर कंगना रणौतचे खडेबोल; म्हणाली, “पुरुषांना प्लास्टिकची बॅग…”

अभिनेत्री सारा अली खानने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक रील शेअर केली; ज्यात सारा १९६० च्या दशकाची आठवण करून देते. ‘हमजोली’ चित्रपटातील ‘ढल गया दिन, हो गयी शाम’ या गाण्यावर बॅडमिंटन खेळत सारा नृत्य करताना दिसतेय. यात साराने गुलाबी रंगाची प्रिंटेड जॉर्जेट साडी परिधान केली आहे आणि जुन्या दशकातील अभिनेत्रींसारखी हेअरस्टाईलसुद्धा केली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या गाण्यासह साराने तिच्या रेट्रो लूकचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. त्याला कॅप्शन देत साराने लिहिले, “काश मैं बन सकती बडी अम्मा धिस इज अ रिअर हार्टफेल्ट तमन्ना.” या रेट्रो लूकमधील व्हिडीओमध्ये शर्मिला टागोर यांची नात सारा त्यांच्या जुन्या चित्रपटातील भूमिकांप्रमाणे दिसत आहे. साराच्या या रीलवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत, तिला “ज्युनियर शर्मिला”, असेही म्हटले आहे.

हेही वाचा… डेटवर गेल्यावर बिलाचे पैसे भरणाऱ्या फेमिनिस्ट स्त्रियांना जया बच्चन यांनी लगावला टोला; म्हणाल्या, “त्या किती मूर्ख…”

सारा अली खानच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचे झाल्यास ‘मर्डर मुबारक’ हा थ्रिलर चित्रपट १५ मार्च २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये पंकज त्रिपाठी, करिश्मा कपूर व विजय वर्मा यांसारख्या प्रमुख कलाकारांचा समावेश आहे. सारा ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटातही झळकणार आहे. त्यात सारा स्वातंत्र्यसैनिक उषा मेहता यांची भूमिका साकारणार आहे.