बॉलीवूडमध्ये अनेक नवनवे चेहरे आपले नशीब आजमावत असतात. त्यातील काही जण खूप संघर्ष करून सिनेमे मिळवतात तर काही कलाकांराचे आई वडील सिनेसृष्टीशी संबंधित असल्याने त्यांना या क्षेत्रात लगेच संधी मिळते. मात्र बॉलीवूडमध्ये असा एक अभिनेता आहे त्याचे वडील सिनेसृष्टीतील मोठे अभिनेते होते तरीही त्याला २५० ऑडिशन दिल्यानंतर पहिला सिनेमा मिळाला होता. त्याने त्याआधी बॅकग्राउंड डान्सर, तर कधी विविध जाहिरातीतून लहान भूमिका करत बॉलीवूडमध्ये प्रवेश केला.

या अभिनेत्याचे नाव आहे शाहिद कपूर. त्याचे वडील, पंकज कपूर, १९८० पासून चित्रपटसृष्टीतील एक नामांकित अभिनेते आहेत. मात्र, शाहिदने लहानपणी संघर्षमय आयुष्य जगले. त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला तेव्हा तो फक्त तीन वर्षांचा होता. त्यानंतर त्याने आपली आई, नीलिमा अजीम, ज्या एक कथक नर्तक होत्या, यांच्याबरोबर जीवन व्यतीत केले. शाहिदने सांगितले की, चित्रपटसृष्टीत आपली जागा मिळवण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला.

“माझे वडील एक चरित्र अभिनेता आहेत आणि माझी आई १५ व्या वर्षापासून कथक नर्तकी होती. मी भाड्याच्या घरात राहिलो आहे. अनेक ऑडिशन दिल्या आहेत, त्यामुळे मला कधीच विशेष सुखसोयी असलेल्या परिस्थितीची जाणीव झाली नाही,” असे शाहिदने राज शमानीच्या यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीत सांगितले. शाहिदने त्याच्या आयुष्यातील संघर्षांबद्दल बोलताना सांगितले की, “माझ्या संपूर्ण आयुष्यात मला माझ्या परिस्थितीमुळे नेहमीच हतबल वाटायचं.” त्याने पुढे सांगितले की, “काही लोक बीएमडब्ल्यू गाडीत संघर्ष करतात, त्यांचा प्रवास देशातील दोन-तीन टॉप दिग्दर्शकांबरोबर काम करण्यापासून सुरू होतो. पण मी २५० ऑडिशन दिल्यानंतर आलो.”

शाहिदने आपल्या आयुष्यातील त्या काळाची आठवण सांगितली जेव्हा त्याच्याकडे लोखंडवाला मार्केटमधून कपडे खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. “आज लोक म्हणतात की शाहिदचा फॅशन सेन्स खूप चांगला आहे, पण मला यावर हसू येते कारण मला आठवतं की एके काळी माझ्याकडे लोखंडवाला मार्केटमधून कपडे विकत घेण्यासाठीही पुरेसे पैसे नव्हते,” असे त्याने सांगितले.

शाहिदने सांगितले की, त्याच्या या प्रवासादरम्यान अनेकदा त्याच्या सभोवताली लोक त्याला म्हणायचे की तो खूप मेहनत घेतो, पण त्याचे चित्रपट तितकेसे चालत नाहीत. या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम त्याच्यावर होत होता, पण लॉकडाऊनच्या काळात त्याने स्वतःत बदल घडवून आणला.

शाहिदने सांगितले की, ‘कबीर सिंग’ सिनेमाच्या अगोदर त्याला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले जेव्हा त्याला कलाकार, स्टार किंवा व्यक्ती म्हणून कमी लेखले गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याने पुढे सांगितले, “माझ्या २१ वर्षांच्या प्रवासाने मला शिकवले आहे की मी एक सर्व्हायव्हर आहे आणि अशा कठीण परिस्थितीतून मार्ग काढू शकतो.” ‘कबीर सिंग’च्या काही काळ आधी शाहिद संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटात दिसला होता, ज्यात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत होते.