दिग्गज अभिनेत्री व रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी ६ व्या वर्षी अभिनय करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी ७० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘बेबी सोनिया’ म्हणजेच नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्याशी लग्न केलं, त्यानंतर अभिनयातून ब्रेक घेतला. एकदा नीतू कपूर ऋषी समजून सासरे राज कपूर यांच्यावर ओरडल्या होत्या. हा रंजक किस्सा त्यांनी स्वतः पुस्तकात सांगितला आहे.
नीतू कपूर यांनी बालकलाकार म्हणून ‘दस लाख’ आणि ‘दो कलियाँ’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ‘दो कलियाँ’ या चित्रपटातील त्यांच्या कामाचं फार कौतुक झालं होतं. नंतर नीतू यांनी बरेच चित्रपट केले. याच दरम्यान त्यांची भेट ऋषी कपूर यांच्याशी झाली. दोघेही पहिल्यांदा ‘जहरीला इन्सान’ चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. हा चित्रपट १९७४ मध्ये प्रदर्शित झाला होता. नीत व ऋषी यांनी १२ हून अधिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.
‘खुल्लम खुल्ला’ या पुस्तकातील माहितीनुसार, ते ‘बॉबी’ चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि शूटिंग दरम्यान ते जवळ आले. दोघे प्रेमात पडले आणि नंतर करिअरमध्ये शिखरावर असताना, नीतू यांनी ऋषी यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी २२ जानेवारी १९८० रोजी लग्न केले. लग्नानंतर नीतू यांनी सिनेविश्वातील करिअर सोडायचं ठरवलं.
सासरे राज कपूर यांच्यावर चिडल्या होत्या नीतू कपूर
लग्नानंतर नीतू कपूर संसारात रमल्या. त्या सासरच्यांची काळजी घ्यायच्या. त्यांचे कुटुंबातील सर्वांशी चांगले संबंध होते. नीतू कपूर यांचा सासरे राज कपूर यांच्याशी संबंधित एक किस्सा आहे, जो खूप चर्चेत राहिला होता. नीतू कपूर यांनी नणंद रितू नंदा यांच्या ‘राज कपूर: द वन अँड ओन्ली शोमन’ या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. नीतू कपूर एकदा चुकून सासरे राज कपूर यांना फोनवर रागावल्या होत्या, या गोष्टीचा नंतर त्यांना पश्चात्ताप झाला होता.
तो प्रसंग असा होता की एके दिवशी ऋषी कपूर खूप दारू पिऊन घरी आले होते. यामुळे चिडलेल्या नीतू यांनी फोन केला आणि ओरडल्या. त्यांना वाटलं की त्या ऋषी कपूर यांच्याशी बोलत आहेत, पण ते राज कपूर होते. नीतू ओरडल्यावर समोरून रागात आवाज आला, ‘तुला वडील आणि मुलाच्या आवाजातील फरक समजत नाही का?’ हे ऐकून नीतू हैराण झाल्या. नीतू म्हणाल्या होत्या की राज कपूर व ऋषी कपूर या दोघांचे आवाज इतके सारखे होते की त्यांना कोण बोलतंय ते समजलंच नाही आणि चुकून त्या सासऱ्यांवर ओरडल्या. नंतर मात्र त्यांना सासऱ्यांशी अशा पद्धतीने बोलल्याची फार लाज वाटली होती.