Sholay@50 शोले हा हिंदी चित्रपटसृष्टीतला अजरामर चित्रपट प्रदर्शित होऊन आज ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाने इतिहास रचला यात शंकाच नाही. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार, हेमा मालिनी, जया बच्चन, अमजद खान अशी तगडी स्टारकास्ट, सलीम जावेद यांची कथा, जी. पी. सिप्पींचं दिग्दर्शन आणि आर. डी. बर्मन यांचं संगीत अशी परफेक्ट भट्टी या चित्रपटाच्या निमित्ताने जमून आली होती. हा चित्रपट अभ्यासलाही जातो. चित्रपटात लांबीने लहान भूमिका असलेलं पात्रही चर्चेत राहिलं. पण तुम्हाला माहीत आहे का? हा चित्रपट इराणमध्ये प्रेक्षक लपूनछपून बघायचे. याचं कारण काय ते तुम्हाला सांगणार आहोत.
१५ ऑगस्ट १९७५ ला प्रदर्शित झाला शोले
१५ ऑगस्ट १९७५ ला शोले हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तिकिट बारीवर कमाल केली. एक कोटी रुपये या चित्रपटाचं बजेट ठरलं होतं. पण चित्रपट तयार व्हायला तीन कोटी रुपये लागले. तसंच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३५ कोटी रुपये कमावले. हा चित्रपट १९७५ मध्ये सुरु झाला भारतात सुपरहिट ठरलाच. पण इराणमध्ये हा चित्रपट लोक लपूनछपून बघत असत.
इराणमध्ये लपूनछपून का बघितला जात असे शोले?
१९८० च्या दशकात, म्हणजेच शोले प्रदर्शित झाल्यानंतर काही वर्षांमध्ये इराण आणि इराक यांच्यात युद्ध सुरु झालं. त्या काळात इराणमध्ये व्हिडीओ कॅसेट प्ले करणारा व्हीसीआर बाळगण्यास मनाई होती. अशा प्रकारे कुणी व्हिसीआर बाळगला तर तो गुन्हा मानला जाई. इराणच्या कैतेयून या महिलेने या संदर्भातली आठवण बीबीसीला सांगितली. त्या म्हणाल्या त्या काळात व्हिसीआर बाळगणं गुन्हा होता. तरीही खूप जुगाड करुन कसातरी व्हिसीआर आम्ही मिळवला. शोले हा चित्रपट त्या काळात इराणमध्ये लपूनछपूनच पाहिला जाई. जय आणि विरुच्या दोस्तीने आम्हा इराणी प्रेक्षकांची मनं जिंकली. बाहेर युद्ध सुरु असताना आम्ही घरात शोले पाहून मनोरंजन करत होतो. बसंती जेव्हा गब्बरच्या समोर अनवाणी पायांनी नाच करायची तेव्हा मी देखील ताल धरायची. जवळपास प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या घरात हीच स्थिती होती अशी आठवण कैतेयून या महिलेने बीबीसीला सांगितली. शोले आमच्यासाठी फक्त चित्रपट नाही तर आमच्या बालपणाचा तो अविभाज्य भाग झाला आहे असंही त्यांनी सांगितलं.
बांगलादेशातही शोलेचे फॅन होतेच
बांगलादेशी महिला फरझाना यांनी बीबीसीला सांगितलं की साधारण ९० चं दशक असेल. आम्ही सहकुटुंब, सह परिवार शोले बघत असू. प्रत्येक घराघरांत शोलेच्या व्हिडीओ कॅसेट होत्या. यातला गब्बर अबालवृद्धांना आवडला होता. बांगलादेशात तर गब्बरची नक्कल करत अनेक लहान मुलं खेळही खेळायची. त्या खेळात मुलं गब्बरसारखा आवाज काढत विचारत असत कितने आदमी थे? अशीही आठवण फरजाना यांनी बीबीसीला सांगितली. एवढंच नाही तर शोले चित्रपटातील मेहबुबा मेहबुबा हे गाणंही आम्ही गायचो. हेलन यांच्या अदाकारीने आणि नृत्याने आमची मनं जिंकली होती. बीबीसीने हे वृत्त दिलं आहे.