वयाच्या चाळिशीनंतर एखादा माणूस अभिनेता होईल असं कुणाला सांगितलं तर खरं वाटेल का? मात्र बोमन इराणी हा असा अभिनेता आहे ज्यांच्या बाबतीत हे वास्तव आहे. वडिलांचा वेफर्सचा व्यवसाय सांभाळणारे आणि नंतर ताज हॉटेलमध्ये नोकरी करणारे बोमन इराणी सिनेमा क्षेत्रात आले आणि त्यांनी विविध भूमिका करुन प्रेक्षकांना अक्षरशः आपल्या प्रेमात पाडलं आहे.
बोमन इराणींचं बालपण खडतर
बोमन इराणी यांचा जन्म २ डिसेंबर १९५९ चा. मात्र त्यांच्या जन्माच्या आधीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे ते वडिलांना पाहू शकले नाहीत. त्यांचे वडील वेफर्सचं दुकान चालवायचे. ते दुकान चालवत असतानाच ते आजारी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. १९५९ मध्ये बोमन इराणींच्या वडिलांना ६० हजारांचं कर्ज झालं होतं. मात्र त्यांची आई हिंमत हरली नाही. त्यांच्या आईने हे दुकान हाती घेतलं, मुलांना शिकवलं आणि मोठं केलं. मात्र बोमन इराणी यांचं बालपण खडतर होतं. बोमन इराणी यांनी वेटर्स कोर्स केला होता. कारण शैक्षणिकदृष्ट्या ते फारसे प्रगती करु शकले नव्हते.
बोमन इराणी यांना डफर का म्हटलं जायचं?
बोमन इराणी यांना डिसलेक्सिया नावाचा आजार होता. ते काही प्रमाणात तोतरं बोलायचं. लहान असताना जीभ बाहेर काढून जेव्हा ते बोलायचे तेव्हा लोक त्यांना हसायचे. त्यामुळे वर्गात ते शांतच बसायचे. आपण बोलायला तोंड उघडलं तर लोक आपल्याला हसतील अशी भीती वाटल्याने बोमन इराणी वर्गात शांत बसून राहायचे. तसंच त्यांनीच एका मुलाखतीत हे सांगितलं होतं की डिसलेक्सिया वगैरे शब्द तर आत्ता कळले. मी लहान असताना माझ्यासारख्या तोतऱ्या मुलांसाठी एकच शब्द होता.. डफर. तू डफर आहेस तुझं काही होणार नाही पुढे असं लोक मला म्हणायचे. मी मनात म्हणायचो पाहुया. असंही इराणी म्हणाले होते.
आईने सिनेमा पाहण्यासाठी प्रेरणा दिली
“मी जन्मलो तेव्हापासूनच मला वाटायचं की मी अभिनेता होईन. आमच्या घरासमोर आलेक्झांडर सिनेमा थिएटर होतं तिथे मला माझी आई सिनेमा पाहण्यासाठी पाठवत असायची. माझ्या आईने मला खूप पाठिंबा दिला. तू अभिनेता होऊ शकतोस असा विश्वास आईने दाखवला. एका मोठ्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होतो सुरुवातीची दोन वर्षे मी रुम सर्व्हिस साठी काम करायचो. तिथे लोक फक्त सही करायचे. मला आश्चर्य वाटायचं हे लोक फक्त सही करतात पैसे देत नाहीत का? त्या हॉटेलमध्ये जेव्हा मला पाच रुपयांची टीप मिळाली मला खूप आनंद झाला. मी आईला फोन करुन सांगितलं आज मी पाच रुपये कमवले. कारण लोक मला म्हणायचे की तुझं काय होणार मी पाच रुपये कमवले तेव्हा वाटलं चला मी पाच रुपये तर कमवले.”
वेफर्स दुकान १३ वर्षे सांभाळलं
त्यानंतर १० बाय ४ च्या दुकानात १३ वर्षे बोमन इराणी वेफर्सच्या दुकानात काम करायचे. वेफर्स, गाठीया, पापडी हे सगळं ते विकत असत. तिथे बसून बोमन इराणी गोष्टी लिहायचे. याच दुकानात त्यांचं प्रेम जुळलं होतं.वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी थिएटर करायला सुरुवात केली. त्यांना फोटो काढायला आवडायचे म्हणून त्यांनी कॅमेराही घेतला होता. त्यांनी फोटोग्राफीही सुरु केली. त्यावेळीही त्यांना वाटायचं की मी अभिनेता होईन. त्यांनी सारांश सिनेमा पाहिला होता. त्यावेळी त्यांना वाटून गेलं की आपण जर अभिनेता झालो तर या प्रकारचे अभिनेता होऊ.
I am Not Bajirao नाटक केलं आणि…
I am not Bajirao नावाचं नाटक बोमन इराणी यांनी केलं. त्यानंतर Lets Talk नावाच्या सिनेमासाठी त्यांची निवड झाली. सिनेमा शूट झाल्यावर बोमन इराणींना सांगितलं गेलं की हा सिनेमा प्रदर्शित होणार नाही. विधू विनोद चोप्रा यांनी त्या सिनेमातले काही प्रसंग पाहिले आणि चौकशी केली की हा कोण अभिनेता आहे? त्यावेळी विधू विनोद चोप्रांना कळलं हा बोमन इराणी आहे. बोमन इराणी याविषयी सांगतात, “त्यांनी मला बोलवून घेतलं आणि मला दोन लाख रुपयांचा चेक दिला. मला त्यांनी सांगितलं पुढच्या वर्षीचा डिसेंबर महिना माझ्यासाठी ठेवा. कारण इतरांनी तुम्हाला रोल ऑफर केले तर मला हा पूर्ण महिना हवा आहे. मी त्यांना विचारलं कुठला सिनेमा? ते म्हणाले माझ्याकडे सिनेमाच नाही सध्या. त्यानंतर सहा महिन्यानंतर मला त्यांनी फोन केला ते म्हणाले सिनेमा मिळाला. तो सिनेमा होता मुन्नाभाई एमबीबीएस. हा सिनेमा आला आणि नंतर काय झालं सगळ्यांना माहीत आहेच.”
डॉक्टर अस्थाना हे पात्र साकारलंं आणि
डॉक्टर अस्थाना हे पात्र बोमन इराणी यांनी साकारलं त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. या भूमिकेने त्यांना खूप लोकप्रियता दिली. मुन्नाभाईचा सिक्वल आला त्यातही बोमन इराणी होते. लकी सिंग हा त्यांनी साकारलेला सरदारजी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. तसंच ‘थ्री इडियट्स’मध्ये त्यांनी साकारलेली विरु सहस्त्रबुद्धे अर्थात ‘व्हायरस’ ही भूमिकाही लोकांना आवडली. ‘डरना मना है’, ‘मै हूँ ना’, ‘पेज थ्री’, ‘डॉन’, ‘खोसला का घोसला’, ‘जॉली एलएलबी’, ‘पीके’, ‘व्हेंटिलेटर’, ‘दिलवाले’ या आणि अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. ‘मुन्नाभाई एमबीएबीएस’ सिनेमा २००३ मध्ये आला होता. तेव्हापासून ते सिनेमा क्षेत्रात आहेत. वयाच्या चाळिशीनंतर त्यांनी करिअर सुरु केलं आणि यश मिळवून दाखवलं. त्यांच्या करीअरला २३ वर्षे झाली आहेत. एका वेफर दुकानापासून सुरु झालेलं त्यांचं आयुष्य आणि त्यानंतर त्यांनी घेतलेली मेहनत या सगळ्यामुळे हे यश मिळालं आहे. अशा हरहुन्नरी कलाकाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा!