‘पठाण’, ‘टायगर ३’ आणि ‘वॉर’सारख्या चित्रपटातून यश राज फिल्म्स या बॉलिवूडमधील मोठ्या फिल्म स्टुडिओने यश राज स्पाय युनिव्हर्सची सुरुवात केली. या स्पाय युनिव्हर्सला उत्तम प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला. तसेच नुकतंच यश राज फिल्म्सने नेटफ्लिक्स या बड्या ओटीटी प्लॅटफॉर्मबरोबर हात मिळवत बऱ्याच नव्या सीरिज आणि चित्रपटांची निर्मिती करणार याची घोषणा केली. त्यापैकी काही सीरिज आणि चित्रपट यांची झलकही नुकतीच आपल्याला नेटफ्लिक्सच्या नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाली.

चित्रपटक्षेत्रात एवढं काम करणाऱ्या यश राज फिल्म्सनी आता नवोदित कलाकारांसाठी एक नवा प्लॅटफॉर्म तयार केला असल्याचं वृत्त समोर येत आहे. यश राज फिल्म्सनी स्वतःचं YRF कास्टिंग अ‍ॅप नुकतंच लॉंच केलं आहे. या अ‍ॅपचा वापर जगभरातील अभिनय करण्यास इच्छुक असणारे नवोदित कलाकार कास्टिंगविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकतील तसेच ते या प्लॅटफॉर्मवर ऑडिशनदेखील पाठवू शकतील अशी सोय या अ‍ॅपमध्ये करण्यात आली आहे.

आणखी वाचा : “माझे वडील गटारात झोपायचे…”, बॉलिवूडचा कपटी खलनायक अजित यांच्या मुलाचा मोठा खुलासा

हे अ‍ॅप डाउनलोड करणारी व्यक्ती त्यातच स्वतःची प्रोफाइल आणि पोर्टफोलिओ तयार करू शकते. याबरोबरच या प्लॅटफॉर्मवर त्यांना आगामी चित्रपट तसेच वेबसीरिजसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ऑडिशनबद्दल माहितीदेखील मिळणार आहे. यश राज फिल्म्सच्या नावावर खोट्या जाहिराती देऊन ऑडिशन घेणाऱ्या आणि स्ट्रगल करणाऱ्या तरुणांची दिशाभूल करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं असल्याचं स्पष्ट झालं आहे.

यश राज फिल्म्सच्या बॅनरखाली ज्या ज्या नव्या कलाकारांना लॉंच करण्यात आलं त्यामागे असलेलं शानू शर्मा हे yrf प्रोजेक्ट लीडच नाव आपण बऱ्याचदा ऐकलं असून. शानूच या नव्या अ‍ॅपचा कारभार सांभाळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. होतकरू कलाकारांना थेट यश राज फिल्म्सशी जोडण्यासाठीचा एक मोठा प्रयत्न म्हणून हे अ‍ॅप सुरू करण्यात आलं आहे. कित्येक तरुण अन् तरुणींचं अभिनेता/अभिनेत्री व्हायचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी यश राज फिल्म्सच्या या कृतीचं प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. आता यातून नेमका अभिनयात करिअर बनवू इच्छिणाऱ्यांना कसा फायदा होतो ते येणारी वेळच सांगेल.