‘बिग बॉस ११’मध्ये शिल्पा शिंदे आणि हिना खान यांच्यातील भांडण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसते. बऱ्याचदा किरकोळ गोष्टीवरून सुरू झालेले भांडण नंतर रौद्र रुप घेते. यावेळीसुद्धा असेच काहीसे घडले. शिल्पा नेहमीप्रमाणे सर्वांसाठी स्वयंपाक करत होती. त्यावेळी हिनाने तिला आपल्याला जेवणात ऑम्लेट हवे असल्याचे सांगितले. पण हिनाला ऑम्लेट मिळाले नाही. त्यामुळे याचे कारण विचारण्यासाठी ती शिल्पाकडे गेली. नेमकं याच कारणामुळे या दोघींमध्ये वाद झाला.
शिल्पा स्वयंपाक करत असताना तिथे विकास गुप्पा, अर्शी खान आणि पुनीश बसले होते. तेव्हा हिना शिल्पाला म्हणाली की, ‘पाऊण तासापूर्वी मी तुला ऑम्लेट करण्यासाठी सांगितले होते. पण अजून तू मला ऑम्लेट करून दिलेलं नाही. जर तुला माझ्यासाठी ऑम्लेट करण्याची इच्छा नव्हती तर तू मला तसं सांगायला हवं होतं.’
हिनाच्या अशा बोलण्यावर शिल्पालाही राग आला आणि तिला जशास तसे उत्तर देताना ती म्हणाली की, ‘आम्ही आता बाकीचा स्वयंपाक करायला सुरूवात केली आहे. तुला हव्या असलेल्या गोष्टीबद्दल तू इथे येऊन नीट सांगायला हवं होतं. इथे २४ तास उभं राहायला मी तुझी नोकर नाही.’ यावर हिनाही गप्प बसली नाही. तिनेही लगेच ‘मग काय मी या घरची नोकर आहे का?’, असे प्रत्युत्तर दिले.
यानंतर हिनाने घडलेला प्रकार सपना, लव आणि प्रियांकला सांगितला. हे सगळं सांगताना ती ढसाढसा रडत होती. शिल्पा टास्कमध्ये घडलेल्या गोष्टींचा राग जेवणावर काढते, असा आरोपही हिनाने केला.