आमिर खान आणि त्याच्या लोकप्रियतेचं वादळ थेट चीनमध्येही पोहोचलं आहे. कारण, ‘दंगल’ या चित्रपटाला चीनमध्ये दणदणीत प्रतिसाद मिळाल्यानंतर आता आमिरच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाला चीनी प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. ‘दंगल गर्ल’ झायरा वसिम हिची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘सिक्रेट सुपरस्टार’च्या कथानकाची अनेकांनीच प्रशंसा केली होती. चित्रपटाच्या कथानकासोबतच झायराने साकारलेल्या भूमिकेनेही प्रेक्षक आणि समीक्षकांची मनं जिंकली होती. असा हा चित्रपट आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपला ठसा उमटवताना दिसतोय.
आंतरराष्ट्रीय पातळीवर या चित्रपटाने गेल्या आठवड्याअखेर अवघ्या तीन दिवसांमध्ये २.७२ कोटी डॉलर इतकी कमाई केली. हे आकडे साधारण १७४. १० कोटी रुपयांच्या घरात पोहोचतात. ‘सिक्रेट सुपरस्टार’ने भारतातही इतकी कमाई केली नसून चीनमध्ये या चित्रपटाची कामगिरी पाहून समीक्षकांनीही त्याची प्रशंसा केली आहे. भारतात ‘सिक्रेट सुपरस्टार’ने आतापर्यंत ८३ कोटींची काई केली. तर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या सलमानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने पहिल्या पाच दिवसांमध्ये १७२ कोटींची कमाई केली होती. पण, हे सर्व आकडे मागे टाकत आणि सलमानच्या ‘टायगर…’च्या डरकाळीवर मात करत ‘सिक्रेट सुपरस्टार’ने घेतलेली ही उसळी लक्षवेधी ठरतेय.
वाचा : पुन्हा चरित्रपटांची लाट!
#SecretSuperstar packs a SOLID PUNCH in its opening weekend in China… Close to ₹ 175 cr in 3 days… MIND-BOGGLING indeed…
Fri $ 6.88 mn
Sat $ 10.50 mn
Sun $ 9.84 mn
Total : $ 27.22 million [₹ 174.10 cr]— taran adarsh (@taran_adarsh) January 22, 2018
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी यासंबंधीचे ट्विट करत ‘सिक्रेट सुपरस्टार’च्या कमाईचे आकडे उघड केले. त्यांनी केलेले ट्विट पाहता आमिरच्या लोकप्रियतेचा या चित्रपटाला फायदा झाला असे म्हणायला हरकत नाही. चीनमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी काही अटींचे पालन करावे लागते. संस्कृती आणि इतर काही गोष्टींशी साधर्म्य असणारे चित्रपटच चीनमध्ये प्रदर्शित केले जातात. आमिरचे चित्रपटही अगदी त्याच पठडीतील असल्यामुळे त्यांना चीनी प्रेक्षकांची निर्विवाद पसंती मिळते.