अभिनेता कुणाल खेमू याची मुख्य भूमिका असलेली ‘अभय 2’ ही वेबसीरिज अलिकडेच प्रदर्शित झाली. परंतु, Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली ही सीरिज सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं दिसून येत आहे. शहिद जवान खुदीराम बोस यांचा फोटो गुन्हेगारांचे फोटो असलेल्या फलकावर लावण्यात आल्यामुळे सध्या ट्विटरवर #BoycottZee5 हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.

या सीरिजमध्ये कुणाल खेमू मुख्य भूमिकेत असून राम कपूर हे गुन्हेगाराच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. या सीरिजमधील एका सीनमध्ये गुन्हेगारांचे फोटो असलेल्या फलकावर चक्क शहिद जवान खुदीराम बोस यांचं छायाचित्र लावण्यात आल्याचं पाहायला मिळालं. हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची एकच लाट उसळली असून ट्विटरवर #BoycottZee5 ही मागणी करण्यात येत आहे.

“लाज वाटली पाहिजे Zee5 India. हे खुदीराम बोस आहेत. १९०८ च्या स्वातंत्र्य लढ्यात कमी वयात शहीद झालेले स्वातंत्र्य सैनिक. ज्यांनी पुढील पिढीला धैर्य, हिंमत या गोष्टी शिकविल्या. ज्यांनी तो वारसा दिला. तुम्ही नक्की कोणाच्या बाजूने आहात? भारत की ईस्ट इंडिया कंपनी?”, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

“#BoycottZee5 स्वातंत्र्य लढ्यात सर्वात कमी वयात शहिद झालेले खुदीराम बोस. ज्यांनी ११ ऑगस्ट १९०८ मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावेळी ते केवळ १८ वर्षांचे होते. Zee5 India Zee5Premium ने माफी मागितलीच पाहिजे”, असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या घटनेनंतर अभय 2 चे दिग्दर्शक केन घोष यांनी माफी मागितली आहे. तसंच Zee5 नेदेखील दोन ट्विट करुन माफी मागितली आहे. परंतु, नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट असल्याचं पाहायला मिळत आहे.