मुलांना योग्य वयात लैंगिक शिक्षण देण्याची निकड आज सगळ्यांनाच पटली आहे. शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाचा समावेश व्हावा अशीही मागणी होते आहे. परंतु ते कसं आणि काय प्रकारे द्यावं, याबद्दल मात्र शिक्षणतज्ज्ञ, पालक, शिक्षक, समाजहितचिंतक यांच्यात सहमती होत नाहीए. वयात आलेल्या मुलामुलींच्या लैंगिक प्रेरणा जाग्या झाल्यावर त्याबद्दल त्यांना कुतूहल वाटणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. मात्र, भारतीय समाजात एकूणच लैंगिकतेबद्दल लपवाछपवीच जास्त असल्यानं हे कुतूहल अधिकच अनावर होत असल्यास नवल नाही. पारंपरिक संस्कार, भारतीय समाजाची लैंगिकतेकडे एक अश्लील गोष्ट म्हणून पाहण्याची मानसिकता अशा विविध कारणांमुळे या विषयासंदर्भात एक अघोषित सेन्सॉरशिपच आपल्याकडे लागू आहे. अर्थात कोंबडं कितीही झाकलं तरी उजाडायचं राहत नाही, तसंच लैंगिक जिज्ञासा कितीही दाबून टाकायचा प्रयत्न केला तरी ती दडपून टाकणं अशक्यच असतं. अशानं मग ते कुतूहल आडमार्गानं शमविण्याचे प्रयत्न सुरू होतात. सवंग, उत्तान साहित्य, अर्धवट माहितगाराकडून याबद्दलची विकृत वा चुकीची माहिती पुरवली जाणं, आणि पौंगडावस्थेत येणारे अशा संबंधांतले भलेबुरे, अधुरे, अस्फुट अनुभव यांतून वयात आलेल्या मुलामुलींच्या स्त्री-पुरुष संबंधांबद्दलच्या वेडय़ावाकडय़ा धारणा तयार होत जातात. आणि त्या वेळीच दुरूस्त झाल्या नाहीत, तर त्याचे पुढे जाऊन भीषण व्यक्तिगत आणि सामाजिक दुष्परिणाम होऊ शकतात. हे सगळं आजच्या सुजाण, सुशिक्षित पालक पिढीला नीटच माहीत आहे. आणि म्हणूनच मुलांना योग्य वेळी लैंगिकतेसंदर्भात सजग करणं त्यांना आवश्यक वाटतं. परंतु पारंपरिक मानसिकतेचं जोखड मानेवरून उतरवता येत नसल्यानं, हे नेमकं कसं करावं, ते मात्र त्यांना कळत नाहीए. ही जबाबदारी मुलांच्या शाळेनं आणि शिक्षकांनी घ्यावी असं त्यांना वाटतं. परंतु शाळेतले शिक्षकही तशाच पारंपरिक मानसिकतेतच घडलेले असल्यानं त्यांनाही ही जबाबदारी नकोशी वाटते. परिणामी शालेय पातळीवर लैंगिक शिक्षण देण्या- न देण्याबद्दलचा  गोंधळ आजही सुरूच आहे. आणि त्यावर सर्वमान्य तोडगा निघेपर्यंत तो तसाच सुरू राहणार आहे.
असं असलं तरी मुलांचं वयात येणं काही थांबलेलं नाही.. थांबणं शक्य नाही. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या विस्फोटक युगात तर त्यांचं लैंगिकतेबद्दलचं औत्सुक्य बालवयातच जागं होऊ लागलं आहे. ते शमवण्यासाठी त्यांना इंटरनेट, पोर्न सीडीज् वगैरे गैर तसंच अ-गैर मार्गही सहजी उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या लैंगिक जिज्ञासेचं शमन एकीकडे होतंयही; आणि दुसरीकडे त्यातून नव्या भयंकर व्यक्तिगत व सामाजिक समस्याही उभ्या ठाकत आहेत. या पाश्र्वभूमीवर पालकांना लैंगिक शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारा ‘बीपी’ हा चित्रपट मध्यंतरी येऊन गेला. त्याआधी त्याच नावाची एकांकिका महाविद्यालयीन स्पर्धेत अंबर हडप आणि गणेश पंडित यांनी सादर केली होती. (त्याही पूर्वी ‘लूझ कंट्रोल’ नावाचं याच विषयावरचं एक नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येऊन गेलं होतं. ते या समस्येला थेटपणे भिडणारं होतं.) आणि आता त्यावरच बेतलेलं या जोडगोळीचं ‘बीपी’ हे नाटक भद्रकाली संस्थेनं रंगमंचावर आणलं आहे. ते पाहताना एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवते, ती ही की : यात जी मुलं दाखविली आहेत, त्यांना लैंगिक कुतूहलाबद्दलचे पडणारे प्रश्न हे सुपरफिशियल आहेत. ही मुलं एवढी बावळट्ट नक्कीच नाहीएत. त्यांना लैंगिकतेसंदर्भातील ऑडिओ-व्हिडिओ सीडीज् सहजपणे उपलब्ध आहेत. ही मुलं त्या पाहतातही. आणि तरीही आपण त्या गावचेच नाही अशा तऱ्हेनं ती आपल्या पालकांना किंवा परस्परांना ‘‘ढिंच्याक ढिंच्याक’ म्हणजे काय?’ असला वरकरणी भाबडा वाटणारा प्रश्न विचारतात. परंतु त्यांची एकूण ‘पहूंच’ पाहता मोठय़ांची खेचण्यासाठीच त्यांनी आणलेला हा आव आहे, हे सहजी लक्षात येतं. अशा तऱ्हेनं भुसभुशीत पायावर उभ्या राहिलेल्या या नाटकात पुढं काय होणार, हे कुणीही ओळखू शकेल. या नाटकातली मुलं ही आजच्या पिढीतली आहेत. त्यांना आपल्या ‘ज्ञाना’त भर घालण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. आणि ती तो चोखाळतही आहेत. त्यामुळेच नाटकाच्या शेवटच्या चरणात ही मुलंच पालकांची शिकवणी घेतात.
एक मात्र खरंय, की महाभारतातील पात्रांच्या लैंगिकतेसंबंधात ही मुलं जे प्रश्न उपस्थित करतात, त्यांची उत्तरं द्यायला आजची पालक पिढी चाचरते. त्या प्रश्नांची सयुक्तिक उत्तरं त्यांना माहीत असली तरी ती द्यायची कशी, हा त्यांच्यापुढचा पेच आहे. ‘माझा जन्म कसा झाला?’ या मुलांच्या साध्या, सरळ प्रश्नालाही आजचे पालकदेखील धीटपणे सामोरे जाऊ शकत नाहीत, हेही खरंय. त्यामुळे यासंदर्भात आज जी काही गोची झालीय ती पालक पिढीची आहे. ते उघडपणे मुलांचं याबद्दलचं कुतूहल शमविण्यात असमर्थ ठरताहेत. याला कारण अर्थातच त्यांची पारंपरिक मानसिकता आणि संस्कारांचं ओझं.
त्यावर मार्ग म्हणून मग द्राविडी प्राणायामाने मुलांना लैंगिकतेबद्दलचं ज्ञान देण्याचा मार्ग ही पिढी स्वीकारते. खरं म्हणजे तो ‘रोगापेक्षाही इलाज भयंकर’ या प्रकारातला आहे. त्यावर मुलंच मग त्यांचं बौद्धिक घेतात. मुलांनी आपल्या तथाकथित अज्ञानावर योग्य ती उत्तरं तोवर धुंडाळलेली असतात. ती उत्तरं पालक पिढीला सांगून ते त्यांचं यासंदर्भातलं अज्ञान दूर करू पाहतात तेव्हा कुठं पालक त्यांना ‘आम्हीच खरं तर हे सारं कुभांड रचलं होतं!’ असं सांगून त्यांनाच बुचकळ्यात पाडतात. थोडक्यात, ‘बीपी’मध्ये मुलंच पालकांचं आपल्यासंबंधीचं ‘अज्ञान’ दूर करतात. तर ते असो.
अंबर हडपलिखित आणि गणेश पंडित दिग्दर्शित हे नाटक नेमकं कुणाचं अज्ञान दूर करण्यासाठी लिहिलं गेलं आहे, याबद्दल प्रेक्षकांचा गोंधळ व्हावा असंच आहे. नाटकाचा पहिला अंक मुलांच्या तथाकथित लैंगिक अज्ञानाचा पाढा वाचण्यात आणि पालकांचा त्यासंदर्भातील गोंधळाचा दृष्टिकोन दाखविण्यात खर्ची पडला आहे. हे करताना हास्यास्पद वाटतील असे प्रसंग व घटना नाटकात घडतात. यातले विज्ञानचे आजोबा हे तर अतरंगी, ‘चालू’ माणसाचा मासलेवाईक नमुना ठरावेत. (लेखक-दिग्दर्शकाला ते समंजस, विचारी वगैरे आहेत असं दाखवायचं असलं, तरीही!) नाटकातली बहुतेक पात्रं ‘धंदेवाईक’ गणितं बांधूनच निर्माण केली गेली आहेत. त्यामुळे नाटककर्त्यांना खरोखरच गांभीर्यानं या विषयाबद्दल मुलं व पालकांचं प्रबोधन करायचं आहे की नाही, असा प्रश्न पडतो.  प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हाच त्यांचा प्रधान हेतू दिसतो. अन्यथा अशी कृतक पात्रं आणि त्यांचे तितकेच कृतक व्यवहार त्यांनी दाखवले नसते. नाटकात काही लक्षवेधी गोष्टीही आहेत. उदा. महाभारतातील व्यक्तिरेखांबद्दल सात्विका आणि तिची मित्रमंडळी तिच्या कीर्तनकार आईला जे अडचणीचे प्रश्न विचारतात, तो भाग धमाल जमला आहे. त्या उंचीवर नाटक त्याआधी आणि नंतरही कधीच जात नाही. ते सदासर्वकाळ रंजनाच्याच पातळीवर राहतं. अर्थात नाटककर्त्यांचा तोच हेतू असेल तर तो नक्कीच सफल झाला आहे. नाटकाच्या शेवटी मुलंच नेटद्वारे प्राप्त ज्ञानाचे अमृत आपल्या आई-वडिलांना पाजून समंजसपणे त्यांची शिकवणी घेतात. खरं तर आजच्या युवा पिढीचं हेच वास्तव आहे. मग या नाटकाचा खटाटोप नेमका कशासाठी आहे, असा प्रश्न पडतो. आणि त्याचं ‘मनोरंजन’ या एका शब्दात उत्तरही मिळतं. नाटकाचा पूर्वार्ध मुलांचं लैंगिकतेबद्दलचं तथाकथित अज्ञान आणि पालकांची गोची दाखविण्यात खर्ची पडलाय. त्यात जबरदस्तीनं आपली करमणूक करून घ्यावी लागते. उत्तरार्धात नाटक जरा ताळ्यावर येतं. परंतु त्यात पालक पिढी बाहेरख्याली असल्याचं चित्र रंगवल्यामुळे प्रेक्षक पुन्हा संभ्रमित होतो. अर्थात हे धक्कातंत्र असल्याचा बोध शेवटाकडे होतो आणि प्रेक्षक सुटकेचा नि:श्वास सोडतात. परंतु या सगळ्यात नाटकाचा नक्की फोकस काय आहे, हा प्रश्न मनात वागवतच प्रेक्षक नाटय़गृहाबाहेर पडतो. असो.
कलाकारांना जसे आपण नाही आहोत ते सादर करावं लागल्यानं त्यांच्या कामात जो एक कृतकपणा येतो, तो यातल्या तरुण मुलांच्या भूमिकांत प्रतिबिंबित झालेला दिसतो. म्हणजे ती चांगलं काम करत नाहीत असं नाही. ती जीव तोडून काम करतात, परंतु त्यांना नाटकाचा आशय ‘कन्व्हिन्स’ झालेला नाही, हेही जाणवतं. सराईतपणा आणि भूमिकेशी.. त्यातल्या आशयाशी तादात्म्य पावणं या दोन भिन्न गोष्टी असतात. इथं पहिली गोष्ट लागू पडते. प्रथमेश परब, भाग्यश्री शंकपाळ, यशोमान आपटे, विभव राजाध्यक्ष, मधुरा दिवेकर या मुलांनी आपल्या परीनं उत्तम कामं केली आहेत. समीर चौघुले (विज्ञानचे बाबा) आणि सुनील तावडे (विज्ञानचे आजोबा) यांच्या कामांत बनचुकेपणा जाणवतो. श्रद्धा केतकर-वर्तक यांनी सात्विकाची आई अर्कचित्रात्मक शैलीत छान साकारली आहे.
एकुणात, नाटकाच्या नेमक्या हेतूबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं हे नाटक तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता, यावर ते तुम्हाला आवडणं वा न आवडणं अवलंबून आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवींद्र पाथरे

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bp sexual education illogical lesson
First published on: 11-01-2015 at 12:28 IST