हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिट आणि अभिनेत्री अँजेलिना जोली यांच्यामधले वाद अजून वाढले आहेत. याआधी त्यांची मुलं ही अँजेलिनाकडेच राहणार या अँजेलिनाच्या अटीला ब्रॅडने मान्यता दिली होती. पण आता तो त्याच्या वक्तव्यावर फिरला आहे. त्याने कॅलिफोर्निया येथील एका न्यायालयात कागदपत्र दाखल करुन अँजेलिनावर हा दावा केला आहे की, तिने मुलांसंदर्भात झालेला करार सर्वांसमोर आणला.

त्याच्या या दाव्यानुसार, त्याने जोलीवर आरोप केला की, तिने तिच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल आणि थेरपिस्ट यांच्याबद्दल सार्वजनिक खुलासा केला आहे. इतकी संवेदनशीलबाब सर्वांसमोर आणल्यावाचून ही अभिनेत्री राहू शकली नाही. तिचे स्वतःवर कोणतेही नियंत्रण नाही.
त्यामुळे या कागदपत्रांनुसार, मुलांच्याबाबतीत तिच्या बाजूने कौल गेला असूनसुद्धा जोलीने या सर्व गोष्टींकडे कानाडोळा केला. पीटने न्यायाधीश रिचर्ड जे. बर्ज यांना या मुद्यांवर लक्ष देऊन निर्णय देण्याची विनंती केली आहे. यासंदर्भातली पुढील सुनावणी १७ जानेवारीला होणार आहे.

लाइव्ह हिंदुस्तान या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, जोली हिच्या निकटवर्तीयांनी पेजसिक्स डॉट कॉम या संकेतस्थळाला दिलेल्या वृत्तानुसार, अँजेलिना जोली आणि ब्रॅड पीटने मुलांचे हक्क अँजेलिनाचकडे ठेवण्याचे आधी मान्य केले होते. पण आता पीटद्वारे अनावश्यक कागदपत्र न्यायालयात सादर केली जात आहेत. पण पीटच्या टीममधील एका सुत्राने सांगितले की, जर हे दोघं मुलांचे हक्क पीटकडे रहावे या गोष्टीवर सहमत झाले तर १७ जानेवारीला होणाऱ्या सुनावणीची गरजच पडणार नाही.

सध्या सहाही मुलं अँजेलिनाकडेच राहत आहेत. मैडाक्स (१५), पैक्स (१२), जहारा (११), शिलोह (१०) आणि आठ वर्षांचे जुळे नॉक्स आणि विवियन आपल्या आईसोबतच राहणार. अँजेलिनाने सप्टेंबर महिन्या घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला होता. यावेळी तिने घटस्फोटाचे कारण दोघांमधले मतभेद असे सांगितले होते. हॉलिवूडच्या या नावाजलेल्या जोडीने लग्नाच्या २ वर्षानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अँजेलिना आणि ब्रॅड २००४ पासून एकत्र आहेत. २०१४ मध्ये या दोघांनी लग्न केले. १२ वर्षांच्या सहवासानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांना एकणू ६ मुले आहेत. त्यात दत्तक मुलांचाही समावेश आहे. ‘मि अॅण्ड मिसेस स्मिथ’ चित्रपटाच्या सेटवर ब्रॅड आणि अँजेलिनाची भेट झाली. या आधी ब्रॅडचे जनेफर आईन्स्टनशी लग्न झाले होते, तर अँजलिनाचे पहिल्यांदा जॉनी ली मिलर आणि त्यानंतर बिली बॉब थ्रॉंटॉनशी लग्न झाले होते.