रणबीरबरोबरच्या प्रेमभंगाने मी माणूस म्हणून घडले!

दीपिका पदुकोण.. बॉलिवूडची नवीन ‘ड्रीम गर्ल’, आत्ताची सर्वात यशस्वी आणि हुशार अभिनेत्री अशी स्तुतीसुमने तिच्यावर उधळली जातात.

दीपिका पदुकोण.. बॉलिवूडची नवीन ‘ड्रीम गर्ल’, आत्ताची सर्वात यशस्वी आणि हुशार अभिनेत्री अशी स्तुतीसुमने तिच्यावर उधळली जातात. तिच्या चित्रपटांची जेवढी चर्चा झाली आहे तेवढीच तिच्या प्रेमप्रकरणांचीही चर्चा केली जात होती आणि आजही होते आहे. पण, दीपिकाने आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या कोणत्याही गोष्टी लपवून ठेवलेल्या नाहीत. अगदी रणवीरबद्दल तिला विचारल्यावर जितक्या सहजपणे ती त्याचे कौतुक करते त्याच सहजतेने ती आजही रणबीरबरोबरच्या प्रेमभंगाचीही कबुली देते, याची प्रचिती पुन्हा एकवार तिने आणून दिली आहे.
नुकत्याच एका जाहीर कार्यक्रमात ‘तुला पुन्हा रणबीरकडे परतावेसे वाटले नाही का?’, असा प्रश्न दीपिकाला विचारण्यात आला. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता तिने त्याच्याकडे परत जाण्याचा विचार मी कधीच केला नाही, असे स्पष्टपणे सांगितले. आमच्यातले प्रेम संपुष्टात आल्यानंतरही आम्ही दोघे आपापल्या स्तरावर वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य पुढे नेऊ शकलो. तिथेच अडकून पडलो नाही, याबद्दल आनंदच वाटत असल्याचे दीपिकाने सांगितले. एक वेळ होती जेव्हा ही घटना घडल्यानंतर मी रणबीरसाठी खूप रडले आहे. प्रेमात हार झाली म्हणून मी खूप रडले. पण मला त्यातून बाहेर पडणे आवश्यक होते आणि ते मला खूप जड जात होते. म्हणूनही मी रडले. पण, त्यातून साध्य काहीच झाले नाही. उलट, मी त्यावेळी एक महत्त्वाची गोष्ट शिकले. आयुष्यात मी कोणत्याही एका व्यक्तीशी, वस्तूशी चिकटून राहणे योग्य नाही. कितीही महत्त्वाचा माणूस असला तरी स्वत:ला हरवून देणे योग्य नाही हे मला समजले आणि त्यानंतर एक व्यक्ती म्हणून मी फार वेगळ्या पध्दतीने घडले. आज मला त्या मानसिक स्थितीत सोडल्याबद्दल मी त्याचे आभार मानते, असे ‘तत्त्वज्ञान’ दीपिकाने ऐकवले.
रणबीरबद्दल इतक्या मोकळेपणे बोलणाऱ्या दीपिकाने आपल्या आत्ताच्या प्रेमवीराबद्दल, रणवीरविषयी बोलतानाही हातचे काहीही न राखता आपली मते व्यक्त केली. रणवीरबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल बोलतानाही आमच्या दोघांबद्दल लोकांना किती उत्सुकता आहे याची माहिती मला आहे. पण, कारकिर्दीच्या या टप्प्यावर असेच कोणालातरी आंधळेपणाने स्वीकारणे आता मला जमणार नाही, असे तिने स्पष्टपणे सांगितले. इतर अभिनेत्री आपल्या सगळयाच गोष्टी दडवून ठेवण्याच्या मागे असताना दीपिकाची ही सहजमोकळी कबुलीही तिला पसंतीची पावती देऊन गेली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Break up with ranbir makes me human being deepika padukon

ताज्या बातम्या