कार्टून वाहिन्यांवर सध्या बच्चेकं पनीसाठी ‘देशी’ आशय किंवा नायक असणाऱ्या मालिकांची निर्मिती करण्यावर भर दिला जातो आहे. छोटा भीम, मोटू-पतलू अशा देशी व्यक्तिरेखा असणाऱ्या नायकांमध्ये आता आणखी एका अ‍ॅनिमेटेड नायकाची भर पडणार आहे. ‘डिस्कव्हरी किड्स’ वाहिनीवर ‘किस्ना’ हा नवा नायक बच्चेकंपनीसाठी दाखल झाला असून त्याच्या निर्मितीची जबाबदारी वाहिनीने प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक केतन मेहतांवर टाकली आहे. हा किस्ना पौराणिक काळातील नसून आधुनिक काळातील साहसी व संशोधकवृत्तीचा आहे.

केतन मेहतांचा ‘माया स्टुडिओ’ हा देशातला पहिला अ‍ॅनिमेशन स्टुडिओ असून त्याअंतर्गत ‘किस्ना’ची निर्मिती करण्यात आली आहे. ‘मिर्च मसाला’, ‘सरदार’ सारखे आशयघन चित्रपट देणारे दिग्दर्शक केतन मेहता अ‍ॅनिमेशन मालिका आणि चित्रपटनिर्मितीतच रमले आहेत. ‘रामायण-द एपिक’ सारख्या अ‍ॅनिमेटेड चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या केतन मेहतांनी ‘डिस्कव्हरी किड्स’कडून आपल्याला ‘किस्ना’ करण्याविषयी विचारणा झाली तेव्हा विशेष आनंद झाल्याचे ‘वृत्तान्त’ला सांगितले. त्याचे कारण म्हणजे आपल्याकडे अ‍ॅनिमेशन उद्योग वेगाने विस्तारतो आहे.
अ‍ॅनिमेटेड चित्रपट आणि मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होत असताना मुलांना आवडेल अशी एक वेगळी व्यक्तिरेखा निर्माण करण्याची संधी मिळते तेव्हा त्यातले आव्हान जास्त भावते, असे केतन मेहता यांनी सांगितले. ‘किस्ना’ करताना नवीन व्यक्तिरेखा मुलांना आपलीशी वाटायला हवी म्हणून कृष्ण प्रतिकात्मकरित्या समोर ठेवून त्याची मांडणी करण्यात आली आहे. मात्र, हा किस्ना पुराणकाळातला नसून आजच्या काळातला साहसी आणि संशोधक वृत्ती असलेला मुलगा आहे, असे ते म्हणाले.
‘डिस्कव्हरी किड्स’ वाहिनीवर कार्टून मालिकेत नुसत्याच गोष्टी सांगून चालत नाही. त्यात मनोरंजन आणि शिक्षण असा मेळ साधावा लागतो. त्यामुळे, ‘किस्ना’ साकारताना प्रत्येक भागात एक विशिष्ट संदेश मुलांपर्यंत पोहोचेल, असा प्रयत्न करण्यात आला असल्याचे वाहिनीचे कार्यकारी उपाध्यक्ष राहुल जौहरी यांनी सांगितले. सध्या देशभरातील ३७ कोटी मुलांसाठी डिस्ने, कार्टून नेटवर्क, पोगो, निकेलॉडिऑन अशा अनेक वाहिन्या आहेत. दिवसातून कमीतकमी दहा तास तरी या वाहिन्या मुले बघतात.
‘किस्ना’ हा पूर्णपणे भारतीय नायक मुलांसाठी आणत त्यांना वाहिनीशी जोडून घेण्याचा हा खास प्रयत्न असल्याचे जौहरी यांनी सांगितले.