‘परत एकदा विचार कर बाई…’
‘मला नकोय हा…’
का…?
नको म्हणजे नकोच हा…
सगळं माहीत असूनही…
भूतकाळ, वर्तमानकाळ माहीत असूनही भविष्यकाळात परत कपाळमोक्ष करून घ्यायचा कशाला…?
मूर्ख आहे का मी…?
तू म्हणतेस ते मला मान्य आहे पण…
हा म्हणतो तुझी लायकी काय आहे…?
परत यालाच निवडला तर खरंच ठरेल तो म्हणतो ते.
माझ्याशी लग्न केल्यामुळे तुला किंमत आली…
तू काय आहेस…?
शिव्या, शिव्या घाण, घाण अर्वाच्य…
आई म्हणाली करावं लागतं…
काय आहे हो हे…?
मनात असो वा नसो कर ना बाई सहन, आम्हाला सुखानं जगू दे, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल?
माझ्या सुखाच काय…?
लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, अग पण मी काय म्हणतेय ते ऐकशील की नाही…? बाबा… ?
मला नकोच आहे हा…
मी पण नोकरी करते, मला पण पगार आहे…
माझं प्रमोशन, याला नकोय.
माझी प्रगती, तर नकोच नको.
मी हवी फक्त भोगायला याला वाटेल तेव्हा, वाटेल तसं क्षणीक…
आणि याच्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य समर्पित करायचं?
मी पीएच.डी.ला अॅडमिशन घेऊ का? असं विचारलं तर काय दवाखाना काढायचाय का..? असं म्हणाला.
हे याचे विनोद, आणि अशी याची बुद्धी
माझं कुठलंही यश
तुझ्या बॉसमुळं, हे याचं उत्तर
माझं प्रमोशन
याचा इमोशनल ब्रेकडाऊन
पगार वाढला
तर कुजकट हसायचं… इतक्या लवकर कसं मिळालं?
बॉस तोच आहे की बदलला…?
मला कुणाचा फोन आलेला चालत नाही.
मी हसून बोललेलं चालत नाही,
इतकं काय त्याच्यात हसायचं…?
असं म्हणतो हा xxxx
मी स्लीवलेस घातला, केस मोकळे सोडले, लिपस्टिक लावली तर छपरी वाटतेस, धंदेवाली दिसतेस, असं म्हणतो हा…
माझं कुणी कौतुक केलं तर चडफड होते याची.
मला तर त्याच्यासमोर मला कुणी चांगल म्हणू नये, असं वाटतं कारण, पुढचा सगळा आठवडा कडू होणार…
सगळं याचच-
याच्याच मालकीचं.
केस का कापले…? कुणासाठी कापले…?
मला का नाही विचारलं…? कुणाकडे कापले…?
हा सेव्ह न केलेला नंबर कुणाचा?
फार फोन येतात अलीकडे त्या नंबरवरून, नाही…?
एकदा तर मला जे छान छान SMS पाठवतेस प्रेमाचे, रोमॅंटिक, सगळ्याच प्रकारचे ते तुला कोण पाठवतं. असं विचारलं
हद्द झाली…
इतके छान SMS याल नकोयत,
मला कोण पाठवतं..? याचीच चिकित्सा.
थोडं लाडात आलेतर
पाय फार दुखतायत, दगदग झाली आज
तेव्हा कुठं जातो याचा माज…?
काही गोष्टी मला मान्य आहेत पण,
मला हा नकोय
रानटी आहे हा…
पितो हे सांगायचंच राहिलं होतं. अती पितो… ओकेस्तोवर
हा प्रश्न विचारतो. खूप अनावश्यक.
जाब विचारतो
का? मी पण मी आहे, नोकरी करते…
प्रत्येक गोष्टीत माझं स्त्रीपण, मीपण मारतो.
ह्याची हुकूमशाही, मी गुलाम, सगळं याचंच असेल
मी, माझं काहीच नसेल
तर मला दोन महिने सहन होईना हा
मला परत कसा हवा असेल…?
आई सांग…
बाबा बोला…

ता.क.

‘सगळे त्यांचीच बाजू घ्या…’
काही पीडित पुरुष…
– मिलिंद शिंदे