‘एकुलती एक’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या सिध्दार्थ मेननने कमी वेळातच तरूणींना आपल्या प्रेमात पाडले. ‘पोपट’, ‘हॅप्पी जर्नी’, ‘स्लॅमबुक’, ‘राजवाडे अॅण्ड सन्स’, ‘पोश्टर गर्ल’ या हिट चित्रपटातून त्याने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. ‘इथेच टाका तंबू’ या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत तो त्याच्या चॉकलेट बॉय इमेजच्या चौकटीतून बाहेर पडला. चित्रपटांमधून आपल्या फिमेल फॅन्सवर जादू करणाऱ्या या अभिनेत्याने वर्षभरापूर्वी लग्न करून अनेक मुलींचे हृदय तोडलं. पण तुम्हाला माहितीये का ज्याप्रमाणे ‘पोश्टर गर्ल’मध्ये सिद्धार्थ सोनालीच्या प्रेमात पडला होता, तिला आपल्या प्रेमात पाडण्यासाठी त्याने अनेक शक्कलही लढवल्या, त्याचप्रमाणे पुर्णिमाचे प्रेम मिळवण्यासाठीही सिद्धार्थला दिव्य पार करावी लागली होती. सिद्धार्थ मेननने गेल्याच वर्षी पुर्णिमा नायरशी लग्न केलं. साऊथ इंडियन पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. विशेष म्हणजे पुर्णिमा हेच सिद्धार्थचं पहिलं आणि शेवटचं क्रश. शाळेत असतानाच सिद्धार्थ तिच्या प्रेमात पडला होता.
मला त्यावेळी तिच्यात सुंदर आणि निरागस मुलगी दिसली होती. माझ्या मनातील तिची ही छबी आजही तशीच कायम आहे. मी आणि पुर्णिमा एकाच शाळेत होतो. पण, ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असल्यामुळे आमचे वर्ग वेगळे होते. त्यामुळे वर्गात समोरासमोर बाकांवर बसून नजरानजर होण्याची संधी आम्हाला मिळाली नाही. त्यामुळे कधीतरी शाळेच्या आवारात ती दिसली की मी तिच्याकडे पाहत बसायचो. ती संस्कृत शिकण्यासाठी एका क्लासला जायची. योगायोगाने मीसुद्धा त्याच क्लासला जात होतो. पण आमच्या वेळा वेगवेगळ्या होत्या. ऐरवी तिला कधी पाहायला मिळत नव्हते म्हणून तिच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवण्यासाठी मी क्लासमध्ये माझी वेळ बदलून घेतली. मी अजून काही क्लासेस लावलेत असं खोट सांगून तिच्या बॅचमध्ये अॅडमिशन मिळवलं. त्यामुळे सगळ्यांना प्रश्न पडला की, हा ज्युनिअरच्या बॅचमध्ये कसं काय आला? पण मी फक्त तिच्यासाठी गेलो होतो.
नंतर शाळेतून बाहेर पडल्यानंतर तिचा आणि माझा काहीच संपर्क राहिला नाही. मी तिला तेव्हा कधी माझ्या मनातल्या भावना सांगितल्या नाहीत आणि तिच्या मनात माझ्याबद्दल काही होत का हेसुद्धा मला माहित नव्हतं. नंतर फेसबुक, बीबीएम आल्यानंतर अखेर २०१३ मध्ये ती मला पुन्हा भेटली. तेव्हा मी सर्व काही सांगून टाकलं. मी तुझ्यासाठी संस्कृतची बॅच बदलून घेतली होती असं सांगितल्यानंतर तिला आश्चर्याचा धक्का बसला. तिला यातलं काहीच माहित नव्हतं. खरंतर तिलाच काय पण माझ्या आई-वडिलांना, मित्रांनाही मी असं काही केलं होतं हे माहित नव्हतं. त्यामुळे आता सर्वांनाच माझं हे गुपित पहिल्यांदाच कळणार आहे. सोशल मीडियामुळे सिद्धार्थ आणि पुर्णिमाची रेशीमगाठ जुळल्याचं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com