नोटाबंदीवर तयार करण्यात आलेल्या दिग्दर्शक सुवेंदु घोष यांच्या ‘शून्यता’ या बंगाली चित्रपटातील ६ सीन्सवर सेन्सॉरने कात्री लावली आहे. या वृत्ताला दिग्दर्शक घोष यांनी दुजोरा दिला असून ६ सीन कट करुन चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी देखील दर्शविली आहे. चित्रपटाच्या चौकशी समितीने या चित्रपटातील काही सीन्सवर आक्षेप नोंदवत हे सीन काढून टाकावेत, अशी शिफारस सेन्सॉरचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्याकडे केली होती. या शिफारशी मान्य करत सेन्सॉरने चित्रपटातील काही आक्षपार्ह संवाद काढून टाकावेत किंवा संवाद ऐकू न येण्याची खबरदारी घेण्याचे सांगितले. यामध्ये आई आणि मुलगी यांच्यातील एका संवादाचा देखील समावेश आहे.
केंद्रीय चित्रपट बोर्डाने सांगितलेल्या गोष्टी मान्य असल्याचे सांगत दिग्दर्शक सुवेंदु घोष यांनी चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे म्हटले. सामान्य जनतेने माझी कलाकृती पाहावी, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. केंद्रीय सेन्सॉर बोर्डाच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सेन्सॉरचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी या चित्रपटावर निर्णय दिल्याचे माहिती दिली. चौकशी समितीच्या शिफारशीनुसार या चित्रपटाला प्रमाणपत्र दिल्याचे त्यांनी सांगितले. चौकशी समितीच्या शिफारशी मान्य केल्यानंतर चित्रपटाला यूए प्रमाणपत्र मिळेल, असा विश्वास चित्रपटाचे दिग्दर्शक सुवेंदु घोष यांनी व्यक्त केला आहे. तसेच सेन्सॉरच्या निर्णयानंतर चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाच्या पोस्टरमध्ये बदल करुन पुन्हा नवीन पोस्टर प्रदर्शित करणार असल्याचे स्पष्ट केले. पोस्ट प्रोडक्शनचे नव्याने काम करुन हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.