उगवत्या सूर्याच्या देशात अर्थात जपानमध्ये मनोरंजनाचा ‘सूर्योदय’ करून ‘जगभर चला हवा येऊ  द्या’ची टीम आता पोहोचणार आहे नयनरम्य सिंगापूरमध्ये! मागच्या आठवडय़ात जपानमध्ये थुकरटवाडीच्या कलंदरांनी हास्याचा धुमाकूळ घातला. आता ही टीम सज्ज झाली आहे सिंगापूरमध्ये हास्यकल्लोळ करण्यासाठी! दुबई, लंडन, पॅरिस, जपानच्या यशस्वी दौऱ्यांनंतर ‘वीणा वर्ल्डसोबत जगभर चला हवा येऊ  द्या’चं वादळ घोंघावणार आहे स्वछतेसाठी आणि शिस्तप्रियतेसाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या सिंगापूरनगरीत! सिंगापूरची ही धमाल आपल्याला पाहायला मिळणार आहे येत्या सोमवार आणि मंगळवारच्या भागात! सिंगापूरचा युनिव्हर्सल स्टुडिओ, मत्स्यालय, सेंटोसा आयलंड, बटरफ्लाय पार्क, जुरोंग बर्ड पार्क अशा वेगवेगळ्या प्रेक्षणीय ठिकाणांची सफर घरबसल्या तुम्हाला होणार आहे. याशिवाय पाहायला मिळणार आहे सिंगापूरचा ‘पांडू हवालदार’. डॉ. नीलेश साबळे दादा कोंडकेंच्या भूमिकेत आणि कुशल बद्रिके  अशोक सराफांच्या भूमिकेत सिंगापूरमध्ये हा आगळावेगळा ‘पांडू हवालदार’ सादर करणार आहेत. सोबतीला सागर कारंडेने साकारलेला शाकाल बघायला मिळणार आहे. अतुल परचुरे आणि श्रुती मराठे या ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेतील ही कलाकार मंडळी थुकरटवाडीतील अतरंगी विनोदवीरांसोबत सिंगापूरमध्ये कल्ला करताना दिसतील.जिथे मराठी तिथे झी मराठी म्हणत थुकरटवाडीतला गुलाब आणि त्याचं कुटुंब जगभरातील रसिक प्रेक्षकांना हसवतं आहे. आता सिंगापूरमध्ये हास्याचा पूर आणण्यासाठी ही मंडळी सज्ज झाली आहेत. येत्या सोमवार आणि मंगळवारी सिंगापूरमध्ये रंगणाऱ्या या हास्यमैफलीची धमाल अनुभवता येईल.