scorecardresearch

Premium

‘चाणक्य’ प्रभावी, प्रत्ययकारी प्रयोग

आर्य चाणक्य हा इ. स.पूर्व ३५० मध्ये जन्मलेला अर्थशास्त्री, राजकीय तत्त्वज्ञ आज सुमारे अडीच हजार वर्षांनंतरही लोकांच्या कुतूहलाचा विषय ठरतो.

chanakya drama
‘चाणक्य’ प्रभावी, प्रत्ययकारी प्रयोग

रवींद्र पाथरे

आर्य चाणक्य हा इ. स.पूर्व ३५० मध्ये जन्मलेला अर्थशास्त्री, राजकीय तत्त्वज्ञ आज सुमारे अडीच हजार वर्षांनंतरही लोकांच्या कुतूहलाचा विषय ठरतो. त्याचं ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ जगभरात अभ्यासलं जातंय. त्याच्यावर अनेक कलाकृती लिहिल्या गेल्या आहेत. गो. पु. देशपांडे, ल. मो. बांदेकर यांची आर्य चाणक्यावरील मराठी रंगभूमीवर आलेली नाटकं याचीच द्योतक आहेत. अलीकडच्या काळात मिहीर भुता लिखित ‘चाणक्य’ हे नाटक बरंच गाजतंय. त्याचं मराठी रूपांतर शैलेश दातार यांनी ‘चाणक्य’ या नावानंच प्रणव जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली अलीकडेच रंगमंचावर आणलं आहे. भारत हा इंग्रजपूर्व काळात तसंच त्याही आधीच्या काळात अनेक राज्यांमध्ये आणि साम्राज्यांमध्ये विखंडित स्वरूपात अस्तित्वात होता. त्यांची आपापसातील दुष्मनी, वैर बाहेरच्या शत्रूंना कामी येत असे. त्यामुळेच भारतवर्षांवर निरनिराळ्या काळांत अनेक परकीय आक्रमणं झाली. त्यातून भयंकर लूट तर केली गेलीच, पण अनेक साम्राज्यंही त्यामुळे लयाला गेली. याची खंत आर्य चाणक्याला कायम लागून राहिलेली होती. अलेक्षांद्र (अ‍ॅलेक्झांडर) हा अत्यंत बुद्धिमान, महापराक्रमी ग्रीक राजा भारतावर चाल करून आला असता त्याचं भारतवर्षांतील सगळ्या राज्यांनी मिळून पारिपत्य करावं अशी चाणक्याची इच्छा होती.

Fali S Nariman passed away
भोपाळ गॅस प्रकरणापासून ‘या’ ऐतिहासिक निकालांमध्ये नरिमन यांचा सहभाग होता निर्णायक
the book mai
स्त्रियांच्या स्वप्नपंखांना बळ देणारं चरित्र
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation
MPSC मंत्र : प्राचीन व मध्ययुगीन इतिहास
maharshi dayanand saraswati marathi article, swami dayanand saraswati marathi news
वेदांमधून बुद्धिप्रामाण्याकडे नेणारे महर्षी दयानंद!

परंतु राज्याराज्यांमधील आपापसातील तंटेबखेडे, अप्पलपोटी नीती आणि परस्परांविरुद्धच्या कारवाया यामुळे ते अशक्य होतं. चाणक्याने मगध साम्राज्यालाही तशी विनंती केली होती. परंतु तिथल्या धनानंद राजाने चाणक्याचं म्हणणं धुडकावून लावलं होतं. तेव्हा अत्यंत संतापून हे जुलुमी, भ्रष्टाचारी नंद साम्राज्य नष्ट करण्याची प्रतिज्ञा चाणक्य करतो. त्यासाठी राजघराण्यातील धनानंदाचा भाऊ चंद्रगुप्त मौर्याला हाताशी धरून त्याच्यामागे सर्वशक्तिनिशी तो उभा ठाकतो. त्याच्याकरवी राज्यातील आदिवासींचं संघटन करून, अलेक्षांद्राच्या शक्तीची पाळंमुळं शोधून काढून त्याच्या मर्मावर घाव घालण्याचं तो ठरवतो. त्यासाठी शत्रुसैन्यात आपली माणसं पेरतो. त्यांची बलस्थानं आणि कच्चे दुवे हुडकून काढतो. आपल्या राजनीतीने निरनिराळ्या राजांना कधी सामोपचाराने, तर कधी युद्धात नामोहरम करून तो आपलं लक्ष्य गाठतो. चंद्रगुप्ताला घडवतो. त्याच्यातून एक महापराक्रमी, बुद्धिमान सम्राट कसा जन्म घेईल याची सर्वतोपरी काळजी घेतो. प्रसंगी त्याला खडसावतोही. वेळ पडताच त्याच्या भावनाशीलतेची खिल्लीही उडवतो. राजाला भावविवश होऊन चालत नाही, त्याने उच्च ध्येयंच समोर ठेवली पाहिजेत याचे धडे चाणक्य चंद्रगुप्ताला देतो. चाणक्याच्या या खाचखळग्यांच्या, खडतर प्रवासाचं नाटय़मय चित्रण म्हणजे ‘चाणक्य’ हे नाटक होय. मगध साम्राज्यातील महाअमात्य राक्षसाचार्याची महती मात्र चाणक्य ओळखून असतो. त्याच्याच पाठिंब्यामुळे धनानंदची सत्ता कायम असते. तो नंद साम्राज्याशी एकनिष्ठ असतो. म्हणूनच नंदाला सत्ताभ्रष्ट केल्यानंतरही त्याची बाजू घेऊन चंद्रगुप्ताविरुद्ध लढू पाहणाऱ्या महाअमात्याला तो दूरदृष्टीने आणि द्रष्टेपणानं माफ करतो आणि त्याला चंद्रगुप्ताच्या बाजूनं वळवतो.

चाणक्याची ही राजनीतीच त्याला इतिहासात अमर करून गेली आहे. सत्य आणि व्यवहारीपणा यांचा समन्वय चाणक्याने राजनीतीत नेहमीच अपेक्षिला. आपल्याला हवं ते साध्य करून घ्यायचं असेल तर प्रसंगी काही गोष्टींना मुरड घालावी लागते, नियम वाकवावे लागतात, हे त्याने प्रामुख्यानं मांडलं. आज आपल्या देशात जे काही चाललं आहे ते या ‘चाणक्य’नीतीचंच फलित आहे असं म्हटलं जातं. पण मुळात चाणक्याने जनतेच्या कल्याणाचं कंकण आपल्या हाती बांधलेलं होतं. पण आज त्यास हरताळ फासला जात आहे. कसंही करून सत्ता मिळवणं, ती येनकेन मार्गानं राखणं, त्यासाठी वाट्टेल ते अनैतिक मार्ग चोखाळणं हीच ‘चाणक्य’नीती आजच्या सत्ताधाऱ्यांनी राबवायचं ठरवलेलं दिसतं. त्यामुळे आजच्या राजकारणाला जो चाणक्याचा संदर्भ दिला जातो तो सर्वथा गैर आणि अनुचित आहे. चाणक्यावर, त्याच्या राजनीतीवर अन्याय करणारा आहे.

लेखक मिहिर भुता यांनी चाणक्याची राजनीती चांगल्या प्रकारे नाटकात अधोरेखित केली आहे. त्याचे निरनिराळ्या राजांसंदर्भातील डावपेच, त्यातल्या खाचाखोचा, चंद्रगुप्ताला घडवतानाचं त्याचं कौशल्य, शिल्पकारीता, वेळप्रसंगीचे कठोर निर्ममपण, महाअमात्यांसंबंधीचे त्याचे धोरण, त्याला चंद्रगुप्ताच्या बाजूने वळवण्यासाठीचं त्याचं वाक्पटुत्व हे सगळं उत्तम प्रकारे नाटकात प्रतिबिंबित झालेलं आहे. नाटक चाणक्यासंबंधी असल्याने नाटकात सम्राट चंद्रगुप्त काहीसा पार्श्वभागीच राहिल्याचं जाणवतं. त्याची धडाडी, पराक्रम, जनतेप्रतीची निष्ठा, राज्यकारभार हे नाटकात येत नाही. कारण तो त्याचा भविष्यकाळ आहे. त्याची घडण हा या नाटकाचा पाया आहे. तो योग्य प्रकारे नाटकात येतो. शैलेश दातार यांनी मूळ नाटकाचं मराठीत रूपांतर करताना अनुवादात बोजडपणा येणार नाही याची पुरती खबरदारी घेतली आहे. अत्यंत प्रवाही, ओघवतं असं हे रूपांतर त्यांनी केलं आहे.

दिग्दर्शक प्रणव जोशी यांनी ‘चाणक्या’चा हा प्रवास योग्य रीतीने कसा होईल याची काळजी घेतली आहे. चाणक्याच्या उदयापूर्वीची भारतवर्षांतील परिस्थिती, त्याच्या चाणक्यनीतीने त्यात पडलेला फरक, चंद्रगुप्ताची जडणघडण, चाणक्यानं विविध राजांना हाताळताना केलेली धोरणी चाल, खलबतं, चंद्रगुप्ताचे कमकुवत दुवे ओळखून त्याबद्दल त्याला वेळीच दिलेली समज, त्याच्यातून एक महान राजा घडवण्यासाठी वेळोवेळी चाणक्याने त्याला केलेला उपदेश हे सारं प्रसंगांतून नीटनेटकेपणानं उभं राहील याची दक्षता त्यांनी घेतली आहे. मात्र, अर्थतज्ज्ञ म्हणून चाणक्याची ओळख हा नाटकाचा विषयच नसल्याने त्याला त्यांनी हात घातलेला नाही. खरं तर ‘चाणक्य’ हा अत्यंत मांडायला कठीण असा विषय. पण दिग्दर्शकानं तो लीलया हाताळला आहे. संदेश बेंद्रे यांचं स्तरीय, सांकेतिक तसंच वास्तववादी नेपथ्याचा एकाच वेळी घातलेला समन्वय नाटकाची मागणी पुरवणारा आहे. राहुल जोगळेकर यांची प्रकाशयोजना नाटय़ांतर्गत ताणतणाव ठळक करणारी आहे. निनाद म्हैसाळकर यांचं पार्श्वसंगीत स्थळकाळाचे संदर्भ उठावदार करणारं आहे. नीरजा (वेशभूषा) आणि कमलेश बीचे (रंगभूषा) यांनी इतिहासकालीन व्यक्तींना ‘चेहरे’ देण्याचं काम चोख बजावलं आहे. सिद्धांत घरत यांची साहसदृश्यं लक्षवेधी.

चाणक्याच्या प्रमुख भूमिकेत शैलेश दातार यांनी प्रत्ययकारी कामगिरी केली आहे. चाणक्याचं बोलणं-चालणं, हावभाव, व्यक्त होणं, मंचीय वावर, निर्धार, राजनीती, त्यातले खाचखळगे, व्यक्तिगणिक बदलत जाणारी त्याची चाल, जनतेचं हित आणि त्यासाठी करावयाची सगळी उरस्फोड.. हे सारं त्यांनी अत्यंत ताकदीनं पेश केलं आहे. प्रसंगाप्रसंगांत त्यांची बदलत जाणारी चर्या पाहणं सुखद ठरतं. त्यातले आरोह-अवरोह त्यांनी खुबीनं आत्मसात केले आहेत. ज्ञानेश वाडेकर यांचा महाअमात्य राक्षसाचार्य सुंभ जळला तरी पीळ न जाणारा आहे. त्यांची संवादोच्चारांवरील हुकूमत आणि जरब वाखाणण्याजोगीच. चंद्रगुप्ताची घडण चैतन्य सरदेशपांडे यांनी प्रामाणिकपणे साकारली आहे. त्याच्या मनातील द्वंद्व, संघर्ष, भावप्रक्षोभ त्यांनी उत्कटपणे प्रकट केले आहेत. रवींद्र कुलकर्णी यांनी पुरुराज, धनानंद आणि शेबराज या तिन्ही भूमिकांचं वेगळेपण लीलया पेललं आहे. त्यातले कंगोरे नेमकेपणानं व्यक्त केले आहेत. विक्रांत कोळपे यांचा पर्वतक हिशेबी, चलाख, राजनीतीनिपुण आणि धोरणी वठला आहे. ऋषिकेश शिंदे (सेनाध्यक्ष, आदिवासी आणि सेनानायक), कृष्णा राजशेखर (सुमोहा), संजना पाटील (कटिका), नील केळकर (रक्षक), प्रसाद माळी (धर्मज), हरीहर म्हैसकर (गोपालक, धनपाल), जितेंद्र आगरकर (वक्रनास, मंत्री) या सगळ्यांनीच आपापल्या भूमिकांत जीव ओतला आहे. आज कौटुंबिक नातेसंबंधांची तीच तीच नाटकं पाहत असताना एक वेगळं, सशक्त आशयाचं नाटक बघितल्याचं समाधान ‘चाणक्य’ पाहताना मिळतं. आणि हेच या नाटकाचं यश आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chanakya is an effective convincing experiment ysh

First published on: 08-10-2023 at 02:30 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×