|| चिन्मय मांडलेकर

‘गेम ऑफ थ्रोन्स’ या अमेरिकन काल्पनिक नाटय़ाने अवघ्या जगाला वेड लावलं. या सीरीजच्या आठव्या पर्वाचा शेवटचा भाग १९ मेला प्रदर्शित झाला. ही सीरिज पाहणाऱ्या लेखक, दिग्दर्शक, अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी ‘गेम ऑफ थ्रोन्स’बद्दल त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे..

मला ‘गेम ऑफ थ्रोन्स’ सीरिजबद्दल कळलं त्याआधी त्याचे सहा पर्व (सहा सीझन) झालेले होते. त्यानंतर मी बघायचं ठरवलं. मला उत्सुकता होती. त्याविषयी खूप ऐकलं होतं. सातवं पर्व यायच्या सहासात महिने आधी मी संपूर्ण सीरिज बसून पाहिली. ज्याला आपण बिंज वॉचिंग म्हणतो त्या पद्धतीने पाहिली. माझी अशी सवय आहे की एखादी कलाकृती पुस्तकावर आधारित असेल तर आधी पुस्तक वाचून काढायचं. तसं मी उत्साहाने आधी पहिलं पुस्तक ‘अ साँग ऑफ आइस अँड फायर’ (जॉर्ज आर. आर. मार्टिन) वाचायला घेतलं. या पुस्तकांच्या सीरिजमधील सगळी पुस्तकं वाचून मग ‘गेम ऑफ थ्रोन्स’ बघायला सुरुवात केली तर जगाच्या खूप मागे पडेन. कारण पुस्तकं खूप मोठी आहेत. ती वाचनीय आहेत. म्हणून मी त्या सीरिजमधली सगळी पुस्तकं वाचली नाहीत. फक्त पहिलंच पुस्तक वाचलं. नंतर माझ्या असं लक्षात आलं की स्पॉयलर्स खूप यायला लागले. कारण लोक आजूबाजूला असं झालं, तसं झालं अशी या सीरिजवर चर्चा करायचे. मग मी शेवटी पुस्तक बाजूला ठेवून सीरिज बघायला सुरुवात केली.

माझं एक मत आहे की गेल्या काही वर्षांत ज्या काही उत्तमोत्तम सीरिज झालेल्या आहेत, त्यातील ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही निश्चितच आहे. नुकतंच सीरिजचं आठवं पर्व झाल्यावर सर्वत्र मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वेब शोज किंवा टेलिव्हिजन सीरिजचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ला वगळून तो लिहिणं अशक्य आहे.

टेलिव्हिजन हे माध्यम वापरून आपण काय करू शकतो, कुठल्या सर्वोच्च पातळीपर्यंत जाऊ  शकतो, हे ‘गेम ऑफ थ्रोन्स’ने दाखवून दिलं. हे अभूतपूर्व आहे. याचं लिखाण अर्थातच त्याला जॉर्ज आर. आर. मार्टिनच्या पुस्तकांचा पाया होता. तसंच लिखाणात उठावदार झालेली प्रत्येक व्यक्तिरेखा, सीरिजची मांडणी पाहता त्याच्या आधीच्या ज्या सीरिज होत्या, त्याही चांगल्या होत्या. लोकप्रिय झाल्या होत्या. पण तेव्हा असं म्हटलं जायचं की हे टेलिव्हिजन आहे, याला काही मर्यादा आहेत. त्याच्या तार्किक आणि दृश्यात्मक स्वरूपालाही काही मर्यादा आहेत. त्या मर्यादांपलीकडे ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही सीरिज गेली. या सीरिजमध्ये काल्पनिक जग आहे, तरीसुद्धा कुठल्याही देशाने आजच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीला ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे मापदंड लावायचं ठरवलं, तर ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील अनेक घटना, अनेक व्यक्तिरेखा, त्यातले अनेक घटना, प्रसंग पाहून असं वाटेल की हो, हे आता माझ्या देशात, समाजात जे घडतं तेच आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ म्हणजे सत्तेसाठी चाललेला खेळ असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्या सत्तेशी सामान्य माणसाचं तुटलेपण असतं. सत्तेसाठी चाललेला सगळा तो संघर्ष असतो. त्यातील लैंगिकते (सेक्शुएलिटी)पासून ते धर्म या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने या सीरिजमधून मांडण्यात आल्या, हे पाहून मला आश्चर्य वाटतं की एकाच माणसाच्या कल्पनेतून हे सगळं आलं आहे. त्याच्यामध्ये वॉलपासून पलीकडचं वाइडिंग मग ते चिल्ड्रन ऑफ फॉरेस्टपासून ते लॉर्ड ऑफ लाइटला पूजा करणारे हे ज्या पद्धतीने लिखाणापासून ते सगळं दाखवण्यात आलंय ते इतकं भव्यदिव्य आहे की हे पाहून दिपून जायला होतं.

ज्याला लिखाणात रस आहे, त्याला एक लेखक म्हणून मी असं सुचवेन की लेखक म्हणून आपण कुठल्या पातळीपर्यंत जाऊ  शकतो, कुठली उंची गाठू शकतो त्याचं ‘गेम ऑफ थ्रोन्स’ हे उत्तम उदाहरण आहे. अर्थात ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही तशी कादंबरीवर आधारलेली पहिली सीरिज नाही. ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा बराचसा पाया युरोपातील ऐतिहासिक ‘वॉर ऑफ द रोझेस’ झालं त्याच्यावर बेतलेला काही भाग या सीरिजमध्ये आहे. त्यातल्या व्यक्तिरेखा तशा आहेत. ‘लॉर्ड ऑफ रिंग्ज’चा विशेष प्रभाव या सीरिजवर आहे. आणि हे जॉर्ज आर. आर. मार्टिननेही मान्य केलं आहे. आजच्या काळात आपण इतकं पाहिलेलं आणि वाचलेलं असतं त्याचा प्रभाव असतोच ना, तर अशा प्रकारे प्रभाव असला तरी ही सीरिज वेगळी ठरते. सीरिज म्हणून समोर येणारं दृशरूप दिपवून टाकणारं असतं. सीरिजमधील सेर्सेई लॅनिस्टर आणि जीमी लॅनिस्टर यांचं नातं, तसंच सीरिजमधील अनेक प्रसंग तुम्हाला भावूक करतात. शेवटच्या पर्वाला लोकांनी ट्रोल केलं. पण शेवटच्या पर्वातील शेवटच्या भागामध्ये टीरीयन आणि जीमी यांच्यातील एक दृश्य पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. किंवा स्टार्क फॅमिलीमधल्या सगळ्या मुलांची वाताहत होते. सीरिजच्या पहिल्या पर्वात ते एकमेकांपासून वेगळे झाले ते शेवटच्या पर्वात सगळे एकत्र आले, हा सगळाच प्रवास, आर्या स्टार्क आणि डेनेरिअस या व्यक्तिरेखांचा प्रवास बघतो, तेव्हा थक्क व्हायला होतं. एक छंद म्हणून या सीरिजमधल्या एखाद्या व्यक्तिरेखेचा प्रवास कुठून, कसा सुरू झाला आणि तो कुठे कुठे फिरून पुढे कुठपर्यंत गेला तर तेसुद्धा नवल वाटावं असंच आहे. टीरीयन आणि सॅन्सा ही सीरिजमधली माझी लाडकी पात्रं आहेत. या व्यक्तिरेखांच्या प्रवासासारखा प्रवास कोणाचाच नाही. लोक डेनेरिअसला हिरॉइन समजत होते. पण सॅन्साचा प्रवास तिने जे पाहिलंय, जे भोगलंय, ती एक अत्यंत लाडावलेली एका अमीर-उमरावाच्या घराण्यातील एक मुलगी आहे. तिचं एकच स्वप्न आहे, मला छान सुंदर दिसायचंय आणि राजाची पत्नी व्हायचंय. इथपासून तिचं ‘क्वीन इन द नॉर्थ’ बनण्यापर्यंतचा प्रवास हा एक ट्रॅक घेऊ नसुद्धा त्यावर एक सुंदर कादंबरी लिहिली जाऊ  शकते. अशी अनेक ट्रॅक्स आणि व्यक्तिरेखा त्यात आहेत. या सीरिजच्या दुसऱ्या फळीतील व्यक्तिरेखाही तितक्याच प्रभावी आहेत. जसं रामायण आणि महाभारतामध्ये प्रत्येक व्यक्तिरेखेला महत्त्व आहे, तसंच साधारण पौराणिक, काल्पनिक वातावरण मार्टिनने तयार केलं आणि ही सीरिज झाली. मला वाटतं सीरिजने पुस्तकांना न्याय दिला आहे. अर्थातच पुस्तकांचा आवाका खूप मोठा आहे. त्यामुळे सुरुवातीपासून अनेक गोष्टींना सीरिजमध्ये फाटा देण्यात आला. किंवा त्या एडिट झाल्या. उदाहरणार्थ, या सगळ्या स्टार्क मुलांची आई कॅटलीन हीची व्यक्तिरेखा पुस्तकामध्ये मरते पण तिला नंतर जिवंत केलं जातं. पण सीरिजमध्ये हा ट्रॅक त्यांनी पूर्णपणे उडवून लावला. सीरिज करताना असे काही बदल करावे लागतात. पहिल्या सहा पर्वाचा ज्या पद्धतीने आवाका होता. त्या तुलनेत सातव्या आणि आठव्या पर्वावर खूप टीका झाली.

मला याचं कारण एकच वाटतं. पहिल्या सहा पर्वाच्या तुलनेत सातव्या आणि आठव्या पर्वात घटनांना वेग खूप होता. शेवटच्या दोन पर्वामध्ये इतक्या गोष्टी भरभर झाल्या की त्या पचनी पडल्या नाहीत. पण वैयक्तिकरित्या सांगायचं झालं तर ज्या नोटवर ही सीरिज संपली, ते प्रेक्षक म्हणून मला आवडलंय. माझा त्याबद्दल काही आक्षेप नाही आहे.

या सीरिजमधील आकर्षणाचा पहिला भाग म्हणजे याचं लिखाण. काही अप्रतिम संवाद, काही सुंदर प्रसंग पहिल्या भागापासून ते शेवटच्या भागापर्यंत मला आवडले. आकर्षणाचा दुसरा भाग म्हणजे त्याचं सादरीकरण.. इथे ड्रॅगन्स आहेत, व्हाइट वॉकर्स आहेत, काय नाहीय, इथे सगळंच आहे. तसंच चित्रीकरण स्थळं खासकरून व्यक्तिरेखांचा प्रवास दाखवताना दिसलेली विविध स्थळं पाहताना चमत्कृत व्हायला होतं. आर्या स्टार्कचा प्रवास बघताना ती जेव्हा योद्धा म्हणून समोर येते तेव्हा ती त्या व्यक्तिरेखेतही चपखल बसते.

आपल्याकडे आपण दैनंदिन मालिकांची सवय लावून घेतली आहे. पण ‘गेम ऑफ थ्रोन्स’आणि त्या सगळ्या परदेशी सीरिज पाहिल्या तर त्या मर्यादित भागांच्या असतात. वर्षांतून आठ एपिसोड असतात. त्यामुळे पाचसहा महिने आधी लेखन केलं जातं. मग चित्रीकरण होतं. त्यानंतर प्रसारण होतं. ही कामाची पद्धतच वेगळी होऊ न जाते. आता अलीकडे मर्यादित भागांच्या भारतीय वेब सीरिज येऊ  लागल्या आहेत. पण यालाही दूरचित्रवाणीसारखे मापदंड लावायला लागलो तर योग्य होणार नाही. ‘गेम ऑफ थ्रोन्स’चं एक वेगळेपण असंही सांगता येईल की त्यांनी त्यांच्या सीरिजमधील काही व्यक्तिरेखा मारण्यासाठी आणि हिरॉइनला खलनायिका बनवण्यासाठी ते रुथलेस (निर्दयी) झाले. पण आपण भारतीय लोक हे करायला घाबरतो. प्रेक्षकांना आवडेल म्हणून ते दिशा बदलत नाहीत.

मला वाटतं डोळे उघडे ठेवून ही सीरिज पाहिली, तर तुमच्या लक्षात येईल की ‘गेम ऑफ थ्रोन्स’ तुमच्या आजूबाजूला सुरू आहे. आता त्यातला तुमचा जॉन स्नो कोण, तुमचा ड्रॅगन कोण किंवा सीरिजमधल्या इतर व्यक्तिरेखा कोण हे तुम्ही ओळखा..!