१७ वर्ष, १००० भाग आणि पहिल्यापासून एसीपी प्रद्युम्न (शिवाजी साटम)ची तीच टीम असं असूनही ‘सीआयडी’ची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. किंबहुना, ‘सीआयडी’ हा आता आमचा ब्रँड झाला आहे, असे सोनी टीव्हीचे प्रवक्ते अभिमानाने सांगत आहेत. आणि याच ब्रँडने पहिल्यांदा वाहिनीला प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करायला लावले आहे. एखाद्या मालिकेसाठी म्हणून बंदिस्त स्टेजवर इव्हेंट करणे हे वाहिन्यांना नवं नाही. पण, ‘सीआयडी’च्या ‘मिशन मुंबई’च्या निमित्ताने पहिल्यांदाच एखाद्या मालिकेचे कलाकार शहरात जागोजागी फिरून लोकांमध्ये सहभागी होऊन जाहीर कार्यक्रम करणार आहेत.
सोनी टीव्हीचं नाव आणि ‘सीआयडी’ची एकूणच लोकप्रियता लक्षात घेता वाहिनीला रस्त्यावर उतरून इव्हेंट करण्याची गरज का भासावी?, या प्रश्नावर १७ वर्षांनंतरही तीच लोकप्रियता कायम टिकवण्यासाठी लोकोंचा यातला प्रत्यक्ष सहभाग वाढवण्यावर आम्ही भर देत आहोत, असे उत्तर सोनीचे मार्केटिंग हेड गौरव सेठ यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना दिले. गेले १७ वर्ष हा शो देशभरातील प्रेक्षकांनी उचलून धरला आहे पण, मुंबईतून त्याला सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला होता. पण, सध्या गुन्ह्यांची उकल करून दाखवणाऱ्या वास्तव मालिकांची संख्याही वाढत चालली आहे. एवढे वर्ष त्याच टीमबरोबर शो चालवल्यानंतर थोडासा जरी प्रतिसाद कमी झाला तर तो योग्य नाही. त्यामुळे ‘सीआयडी’च्या प्रेक्षकांना पुन्हा याच टीमबरोबर एकत्र जोडता यावं, त्यांचं या टीमप्रती असणारा आदर, ओढ पुढेही कायम रहावी म्हणून ‘मिशन मुंबई’च्या निमित्ताने पहिल्यांदाच मुंबईत ठिकठिकाणी लोकांबरोबर कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे गौरव सेठ यांनी सांगितले.
‘सीआयडी’च्या ‘मिशन मुंबई’चा शुभारंभ नुकताच सायन येथे करण्यात आला. एखादा गुन्हा पकडून देणारे, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याला मदत करणाऱ्या स्थानिक ‘हिरों’ना एसीपी प्रद्युम्न, अभिजीत, दया यांच्या हस्ते यावेळी पुरस्कार देण्यात आले. अशाचप्रकारे मुंबईत विविध ठिकाणच्या स्थानिक हिरोंना गौरवण्याचे काम या मिशनअंतर्गत घेण्यात आले आहे. पण, ‘सीआयडी’चे ‘मिशन मुंबई’ एवढय़ापुरतेच मर्यादित राहणार नसून बुध्दीमान ऑफिसर प्रद्युम्न, शक्तिशाली ऑफिसर दया, जांबाज ऑफिसर अभिजीत अशा प्रत्येकाच्या व्यक्तिरेखेवर वेगवेगळे खेळ रचण्यात आले असून लोकांना या बुध्दीमान खेळात आपला कस लावायचा आहे. मुंबईसारख्या मोठमोठय़ा शहरांतून घडणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनांबद्दल मालिकेतून दाखवले जातेच. पण, प्रत्यक्षात या गुन्ह्यांचा माग तुमच्यातल्याच लोकांच्या मदतीने लावला जाऊ शकतो, हे सांगण्याचा हा आमचा एक वेगळा प्रयत्न असल्याचे सेठ यांनी सांगितले. कारणे काहीही असोत पण, ‘सीआयडी’ला आणि पर्यायाने ‘सोनी’ सारख्या वाहिनीला लोकांमध्ये सहभागी होऊन कार्यक्रम करायला लावणारे प्रेक्षकच खरे ‘हिरो’ ठरलेत!