रेश्मा राईकवार

हिंदी चित्रपटांतून नव्वदचे दशक गाजवणाऱ्या काही अभिनेत्री सध्या वेगवेगळय़ा खास करून ओटीटी माध्यमावरून पुन्हा प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. सुश्मिता सेन, रवीना टंडन ही नावे चर्चेत असताना त्यांची समकालीन असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे मात्र अजूनही ओटीटीपासून दूरच राहिलेली दिसते. तब्बल चार वर्षांनंतर सोनाली झी टीव्हीवरील ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ या शोमधून परीक्षकाच्या नात्याने प्रेक्षकांसमोर आली आहे. २०१८ मध्ये तिला कर्करोगाचे निदान झाल्यानंतर परीक्षक म्हणून करत असलेला शो अर्ध्यावर सोडून उपचारासाठी न्यूयॉर्कला जावे लागले होते. पुन्हा अशाप्रकारे दूरचित्रवाहिनीवर परतण्याची संधी मिळेल अशी कल्पनाही केली नव्हती.. मात्र चार वर्षांनी का होईना पुनरागमनाचा हा अध्याय चांगला रंगला आहे, असे ती म्हणते.

सोनाली तेव्हा ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या रिअ‍ॅलिटी शोची परीक्षक म्हणून काम करत होती. कर्करोगाचे निदान झाल्याने तिला तो शो अर्धवट सोडावा लागला. त्यानंतर पुन्हा इथे येणं हा आनंददायी अनुभव आहे. मी पुन्हा परतेन, काम करेन, अशी कल्पनाही केली नव्हती. एखाद्या शोसाठी काम करत असताना १२-१२ तास तुम्हाला सेटवर काढायचे असतात. चित्रीकरण संपेपर्यंत न थकता, उत्साहाने तुम्हाला परीक्षक म्हणून समोरच्या स्पर्धकांना सांभाळायचं असतं. त्यांचा उत्साह टिकवून ठेवायचा असतो. हे सगळं मी करू शकते आहे, याचा खूप आनंद आहे, असं ती सांगते. त्यावेळीही ती लहान मुलांच्याच शोची परीक्षक होती आणि योगायोगाने ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’मध्येही ती लहान मुलांच्याच शोची परीक्षक म्हणून काम करते आहे. लहान मुलांबरोबर काम करणं सोपं नाही, हा एक वेगळाच अनुभव असतो, असं ती म्हणते. आत्ताची मुलं खूप हुशार आहेत, त्यांना माध्यमांची जाण आहे, अत्यंत मेहनत घ्यायची त्यांची तयारी असते. कित्येकदा त्यांच्यापेक्षा त्यांचे पालक याबाबतीत उत्साही असतात. अर्थात हा सगळा उत्साहाचा भाग असला तरी त्यांच्यावर कुठलंही दडपण येणार नाही, याची काळजी घेत रिअ‍ॅलिटी शो करावे लागतात, असं ती सांगते. मला पहिल्यापासून मुलांबरोबर काम करायला आवडतं, त्यामुळे या नृत्यावर आधारित शोमध्येही मुलांबरोबर काम करताना मला मजा येते आहे, असं तिने सांगितलं.

दूरचित्रवाहिनी हे माध्यम कायम कलाकारांसाठी उपलब्ध होतं, तरी त्याला काही मर्यादा आहेत. त्याउलट ओटीटीसारख्या नवमाध्यमाने खूप नवोदित कलाकारांना संधी दिली आहे. तशी ती तुझ्यासारख्या जुन्या अभिनेत्रींनाही मिळाली आहे. खूप नावाजलेल्या आणि काही काळ अभिनयापासून दूर असलेल्या अभिनेत्री नायिकाप्रधान वेबमालिका, चित्रपटांमधून पुढे येत आहेत. ओटीटी या नवमाध्यमाने हा खजिना खुला केला आहे, हे ती मान्य करतेच. मात्र तिच्या मते एकूणच चित्रपट आणि मालिका विश्वात स्त्रीप्रधान आशय येणं, नायिकांना समान संधी मिळणं या गोष्टी खरंतर खूप आधीच व्हायला हव्या होत्या, असं आग्रही मत तिने मांडलं. गेल्या चार वर्षांत सिनेमाची गणितं खूप बदलली आहेत. करोना काळात ओटीटी माध्यमामुळे जगभरातील गोष्टी पाहिल्या गेल्या. तंत्र बदललं, तसं प्रेक्षकही बदलले. त्यामुळे सध्या ज्या प्रकारे हिंदी मालिका वा वेबमालिकांमधून स्त्रीप्रधान आशयाला महत्त्व दिलं जातं आहे, नायिकांना मध्यवर्ती ठेवून कथा लिहिल्या जात आहेत, हा एकूणच बदल खूप स्वागतार्ह आहे, हे मान्य करूनही या गोष्टी खूप आधीपासून व्हायला हव्या होत्या हे मला कायम वाटत आलं आहे, असं ती सांगते.

लवकरच ओटीटीवर..

करिश्मा, लारा, रवीना अशा समकालीन अभिनेत्री ओटीटी माध्यमांवर आल्या. ती मात्र अजूनही कुठे वेबमालिकांमधून दिसली नाही. हे ऐकताच लवकरच मी ओटीटीवर येणार आहे असं तिने जाहीर केलं. चित्रीकरणही पूर्ण झालं आहे, आता ती वेबमालिका आहे की वेबपट.. याबद्दल आत्ताच काही सांगणं शक्य नाही असं ती स्पष्ट करते. हाही काळाचाच महिमा आहे. आपण काम करतो, मात्र सध्या त्याबदद्ल गुप्तता पाळण्यासंदर्भात इतके करार करावे लागतात की ते प्रत्यक्ष प्रदर्शित झाल्यावरच लोकांपर्यंत पोहोचतं, असं ती सांगते. पहिले सगळं एकदम खुल्लमखुल्ला सांगता येत होतं, आता तसं काही उरलं नाही, असं निरीक्षणही तिने नोंदवलं.

‘स्त्रियांनी सक्षम असायलाच हव’

सध्या मनोरंजन विश्वात झालेले बदल हे स्त्रियांनाही चांगल्या संधी देणारे आहेत. मात्र काळ कोणताही असो, क्षेत्र कोणतेही असो स्त्रियांनी कायम आर्थिकदृष्टय़ा सक्षम असायला हवं, असं ठाम मत सोनालीने व्यक्त केलं. माझी आजी मला नेहमी सांगायची की स्त्रियांनी काम करून आर्थिक-सामाजिकदृष्टय़ा निर्भर राहायला हवं. आजच्या काळातही तिचा विचार महत्त्वाचा ठरतो. स्त्री सक्षम नसेल तर तिचा आर्थिक-सामाजिक स्तर कोणताही असो नातेसंबंधामध्ये तिला मान मिळत नाही. त्यामुळे मुलींना उत्तम शिकून आधी आपल्या पायावर उभं राहायला शिकवायला हवं हे मी पुन:पुन्हा सांगेन, असं ती सांगते. गेले दोन दशकांहून अधिक काळ मनोरंजन क्षेत्रात मानाने वावरलेली सोनाली बेंद्रेसारखी मराठमोळी अभिनेत्री जेव्हा स्त्री सक्षमीकरणाच्या मुद्दयावर जोर देते, तेव्हा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अनुभवातून आलेले बोल आहेत हे लक्षात घ्यायला हवं.