‘द कपिल शर्मा शो’ कात टाकत असतानाच कॉमेडियन सुनील ग्रोवरने प्रेक्षकांना खळखळून हसवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. सुनील ग्रोवर, अली असगर, सुगंधा मिश्रा, चंदन प्रभाकर, संकेत भोसले हे ओळखीचे विनोदी चेहरे पुन्हा एकदा त्यांच्या धमाल विनोदी अंदाजाने प्रेक्षकांची दाद मिळवण्यासाठी सज्ज झालेत. कपिलच्या शोमधून काढता पाय घेतल्यानंतर सुनील ग्रोवर ‘द कॉमेडी फॅमिली’ या कार्यक्रमातून विनोदी खेळी करताना दिसणार आहे. मुख्य म्हणजे कपिल शर्माच्या टीममधील बरेच चेहरे यात सुनीलची साथ देणार आहेत.
‘द कॉमेडी फॅमिली’ कोणत्या वाहिनीवर आणि कधीपासून प्रदर्शित होणार हाच प्रश्न तुमच्याही मनात घर करत आहे ना? पण, जास्त उतावीळ होण्याचं काहीच कारण नाहीये. सुनील त्याच्या नव्या कोऱ्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय खरा. पण, हा एक लाइव्ह कार्यक्रम असेल. या कार्यक्रमातूनच अहमदाबादमध्ये मे महिन्याच्या २७ तारखेला ‘डॉ. मशहूर गुलाटी’ आणि त्यांचं अतरंगी कुटुंब विनोदी फटकेबाजी करणार आहे.
सुनीलने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुनच याविषयीची माहिती देत एक पोस्ट केली होती. ‘गरमी मा मॅंगो खाऊ सू! बढा साथे आउछू’, असं म्हणत अस्सल गुजराती भाषेत सुनीलने त्याच्या या कार्यक्रमासाठी सर्वांना बोलावणंच पाठवलं आहे. सुनील ग्रोवर विविध ठिकाणी सध्या लाइव्ह कार्यक्रम सादर करण्यावर भर देत असून, येत्या काळात तो टेलिव्हिजनवरही परतणार असल्याचं म्हटलं जातंय.
कपिल शर्मासोबत झालेल्या वादानंतर सुनील ग्रोवरने त्याच्याकडे पाठ फिरवली होती. सहकलाकारांसोबत उद्दामपणे वागल्यामुळे कपिलला याचा चांगलाच फटका बसल्याचं पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे या सर्व प्रकरणानंतर ‘द कपिल शर्मा शो’च्या टीआरपी रेटिंगवरही याचा परिणाम झाला. टीआरपी रेटिंगच्या पहिल्या दहा कार्यक्रमांमध्येही कपिलला त्याचं स्थान कायम राखता आलं नाहीये.