चित्रपटांचे आणि जाहिरातीचे चित्रीकरण, सोशल मिडिया अशा अनेक गोष्टींमध्ये व्यस्त असलेल्या बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांना पुन्हा प्रकृती अस्वस्थ्याला सामोरे जावे लागत आहे. पण, यावेळी अमिताभ बच्चन यांची याबाबत कोणतीही तक्रार नाही. कारण ते त्यांचा अधिकाधिक वेळ आता अडीच वर्षांची त्यांची नात आराध्यासोबत घालवू शकत आहेत.
अमिताभ बच्चन यांना छातीत दुखत असल्याचा त्रास जाणवू लागला आहे.  त्यांचे सीटी स्कॅन करून आता उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या ‘भूतनाथ रिटर्न्‍स’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेल्या अमिताभ यांनी आपल्या या आजाराची माहिती स्वत:च ट्विटरवरून दिली. अधिक आराम करणे अमिताभ यांना आवडत नाही. परंतु, आजारामुळे त्यांना जास्तीत जास्त वेळ आराध्यासोबत व्यथित करता येत असल्यामुळे ते फार आनंदी आहेत.
११ मार्चपासून चंपानेर पावगढ येथे ‘खुशबू गुजरात की’ साठीचे चित्रीकरण सुरू होणार होते. परंतु ते अमिताभ यांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे आता पुढे ढकलण्यात आले आहे. या विषयी वृत्तसंस्थेशी बोलताना गुजरात पर्यटन विभागाचे आधिकारी म्हणाले, काही वेळापूर्वी अमिताभ बच्चन यांचा याबाबतचा संदेश आम्हाला मिळाला असून, कार्यक्रमाचे फेरनियोजन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.