मुंबई : पत्रकाराला मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेता सलमान खानविरोधात अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी बजावलेल्या समन्सला दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने गुरूवारी १३ जूनपर्यंत कायम ठेवून त्याला दिलासा दिला. सलमान खान सायकल चालवत असताना त्याचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सलमान आणि त्याचा अंगरक्षक नवाज शेखने शिवीगाळ व मारहाण केली, असा आरोप करून अशोक पांडे या स्थानिक पत्रकाराने अंधेरी न्यायालयात तक्रार नोंदवली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने सलमान व त्याच्या अंगरक्षकाला समन्स बजावून ५ एप्रिलला हजर राहण्याचे आदेश दिले होते.

या निर्णयाविरोधात सलमान आणि त्याच्या अंगरक्षकाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने दोघांना बजावण्यात आलेल्या समन्सला स्थगिती दिली होती. न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठासमोर या दोघांच्या याचिकेवर गुरूवारी सुनावणी झाली. त्यावेळी समन्सला दिलेली स्थगिती न्यायालयाने १३ जूनपर्यंत स्थगिती कायम ठेवली.