सध्याचा सर्वात लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’. वादग्रस्त पण तितकाच मनोरंजक असा हा बिग बॉसचा शो मराठी प्रेक्षकांच्या भेटीला गेल्या वर्षी आला होता. गेल्या वर्षी शोचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. या शोला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता प्रेक्षकांना उत्सुकता होती ती पुढच्या पर्वाची.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अखेर दुसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबद्दलची माहिती देण्यात आली. आता चाहत्यांना उत्सुकता आहे ती शो मध्ये कोणते कलाकार दिसणार याची. ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतील कलाकार बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात सहभागी होण्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. मालिकेतील अभिनेता शैलेश दातार, अक्षया गुरव, वीणा जगताप, अर्चना निपणकर, गौतम जोगळेकर हे कलाकार दिसणार असल्याचे बोललं जातंय.

‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. परंतु आता ही मालिका लवकरच संपणार असून तिच्या जागी ‘हे मन बावरे’ ही नवी मालिका येणार आहे.

ट्विटरव्दारे ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाची झलक ‘तो परत येतोय’ पाहायला मिळाली. तसेच त्यांनी कार्यक्रमाचा नवीन लोगो देखील प्रदर्शित केला आहे. परंतु शो सुरु होण्याची तारिख तसेच पर्वाचे सूत्रसंचालन कोण असणारे ही माहिती गुलदस्त्यातच ठेवली आहे.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची मेघा धाडे विजेती ठरली होती. तसेच उषा नाडकर्णी, जुई गडकरी, सुशांत शेलार, विनीत बोंडे, भूषण कडू, अनिल थत्ते, सई लोकूर, आस्ताद काळे, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, मेघा धाडे यांसारख्या स्पर्धकांनी भाग घेतला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contestent of bigg boss marathi season
First published on: 20-03-2019 at 10:15 IST