गेल्या काही शतकांपासून समाजात बदल घडले असल्याचे दिसून येत असले तरी स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अद्यापही फारसा बदललेला नाही. त्यातही ग्रामीण भागात राहणाऱ्या स्त्रियांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आजही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विदर्भातील दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या वाटयाला येणाऱ्या दु:खाचे वास्तववादी चित्रण करणारा ‘तेरवं’ हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे लेखन श्याम पेठकर यांनी केले असून हरीश इथापे यांनी दिग्दर्शन केले आहे. प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक, अभिनेत्री किरण खोजे, किरण माने, नेहा दंडाळे या प्रस्थापित कलावंतांसह विदर्भातील मधुभैया जोशी, श्रद्धा तेलंग, प्रभाकर आंबोने, वत्सला पोलकमवार, प्रवीण इंगळे, देवेंद्र लुटे, यशवंत चोपडे, शर्वरी पेठकर, संहिता इथापे, वैदेही चौरे, दिलीप देवरणकर या कलावंतांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी दिवंगत शंकर बडे यांच्या कवितेला गाण्याचा साज देण्यात आलेला आहे. ‘तेरवं’ या चित्रपटाच्या निमित्ताने लेखक श्याम पेठकर, अभिनेत्री किरण खोजे आणि छायाचित्रणकार सुरेश देशमाने यांनी ‘लोकसत्ता’शी मनमोकळया गप्पा मारल्या.

हेही वाचा >>> नाटयरंग : एक गुंतेदार, लांबलचक माइंड गेम

Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”

‘तेरवं’ या चित्रपटाबद्दल बोलताना लेखक श्याम पेठकर म्हणाले, ‘तेरवं’ नावाचं नाटक आम्ही करत होतो. या नाटकाचं चित्रपटात रूपांतर केलेलं आहे. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही याआधीही शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या नाटकात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची गोष्ट नाही. ‘नाम’ फाऊंडेशनच्या माध्यमातून काम करत असताना विदर्भ भागातील एकल स्त्रियांना भेटण्याची संधी मिळाली. शेतकरी परिस्थितीमुळे हतबल होऊन आत्महत्या करतात, मात्र त्यांच्या मागे राहिलेल्या त्यांच्या बायका जगण्यासाठी अतोनात संघर्ष करतात. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीला जगण्यासाठी अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो आणि याची सुरुवात तिच्या अस्तित्वावरूनच होते. पतीच्या मालमत्तेवर हक्क सांगेल म्हणून सासरचे जवळ घेत नाहीत आणि माहेरचे तुझ्या लग्नात सगळं काही केलं असं म्हणून तिला दूर करतात. मग या एकटया स्त्रीने काय करावं? कसं जगावं? अशा विदर्भ, खान्देश आणि मराठवाडयात २४ ते २८ वयोगटातील २६ हजार महिला आहेत. त्यांचं आयुष्य, त्यांची जगण्याची धडपड चित्रपटातून आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

या चित्रपटात ९० टक्के कलाकार विदर्भातील आहेत. याविषयी अधिक माहिती देताना, ‘तेरवं’ हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिग्दर्शकापासून या चित्रपटाशी जोडलेला प्रत्येकजण विदर्भातलाच असला पाहिजे हा माझा आग्रह होता, असं श्याम पेठकर यांनी सांगितलं. ‘या चित्रपटाचे दिग्दर्शक हरीश इथापे यांचं काम मी अनेकवेळा पाहिलं होतं, तसंच मी त्यांच्याबरोबर कामदेखील केलं आहे. त्यानंतर आमचे निर्माते नरेंद्र जिचकर हेदेखील विदर्भातील असल्यामुळे आणि त्यांना या विषयाचे गांभीर्य असल्यामुळे त्यांनी चित्रपटासाठी पुढाकार घेतला. छायाचित्रणकार सुरेश देशमाने हेही या चित्रपटासाठी सतत आमच्याबरोबर खंबीरपणे उभे होते. याशिवाय, नाटकात काम केलेल्या आणि प्रत्यक्ष तसे संघर्षमय जगणं जगणाऱ्या पाच एकल महिलांनीही या चित्रपटात काम केलं आहे’, अशी माहिती पेठकर यांनी दिली.

प्रदर्शनातील अडचणी..

‘तेरवं’ या चित्रपटाचा विषय आत्ताच्या तरुण पिढीपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचला, मात्र प्रदर्शित झाल्या झाल्या बहुपडदा चित्रपटगृहांनी इतर चित्रपटांच्या शोजना प्राधान्य देत ‘तेरवं’चे शो कमी केले, काही ठिकाणी हा चित्रपट पुरेशी प्रेक्षकसंख्या नसल्याचे कारण देत उतरवल्याची तक्रार लेखक श्याम पेठकर यांनी केली. ‘चित्रपट निर्मितीच्या तुलनेत चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. मराठीतील असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक करण्यात आले आहे, परंतु या चित्रपटांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यापासून ते चित्रपटगृहात स्क्रीन मिळवण्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या चित्रपटाचे निर्माते नरेंद्र जिचकर यांनी मराठी चित्रपटांना शो मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणींसंदर्भात शासनाला एक लेखी निवेदन दिले असल्याची माहितीही पेठकर यांनी दिली. एकपडदा चित्रपटगृहापेक्षा बहुपडदा चित्रपटगृहाचे भाडे चौपटपेक्षाही जास्त असते. निर्मात्यांना परवडेल अशा भाडेतत्त्वावर बहुपडदा चित्रपटगृह उपलब्ध झाले तर मराठी चित्रपटाचे शो तिथेही लावता येतील, असे नमूद करत शासनाने या संदर्भात पुढाकार घेऊन तोडगा काढावा, असं आवाहन जिचकर यांनी निवेदनात केलं असल्याचंही पेठकर यांनी सांगितलं.

एकल महिलांचा कठोर संघर्ष

या चित्रपटात जना ही मुख्य भूमिका अभिनेत्री किरण खोजे हिने केली आहे. या भूमिकेच्या निमित्ताने विदर्भातील या एकल महिलांबरोबर राहण्याची, त्यांचं जगणं समजून घेण्याची संधी मिळाली हे सांगताना शहरात राहणारे आपण विचारही करू शकत नाही इतकं दुर्दैवी आणि संघर्षमय जगणं त्यांच्या वाटयाला आलं आहे, असं किरणने सांगितलं. ‘या चित्रपटासाठी मला वैदर्भीय भाषा शिकावी लागली. मी मूळची अहमदनगरची आहे, त्यामुळे मला ही भाषा माहिती नव्हती. त्याचा अभ्यास करावा लागला, शिवाय चित्रपटात मला शेतीची कामं सहजतेने करायची होती त्यामुळे तीही शिकून घ्यावी लागली’ असा अनुभव तिने सांगितला. या महिलांना अगदी स्वत:चं म्हणणं मांडण्यासाठीही संघर्ष करावा लागत असला तरी त्या सतत त्याविषयी रडगाणं सांगत नाहीत. आयुष्य अत्यंत साधेपणाने आणि हसतखेळत जगण्याची त्यांची वृत्ती आत्मसात करून घेण्यासारखी आहे. एका मुलीला शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. ती घरातून पळून गेली. तिने जिद्दीने आपलं शिक्षण पूर्ण केलं, आज ती चित्रपट दिग्दर्शनाचं शिक्षण घेते आहे, असे अनेक अनुभव या चित्रपटाच्या निमित्ताने गाठीशी बांधले गेले आहेत, असं तिने सांगितलं. 

वर्षभर पूर्वतयारी..

ग्रामीण समस्येवर असला तरी त्या चित्रपटाच्या विषयाच्या अनुषंगाने त्याचं सादरीकरणही उत्तमच असलं पाहिजे. त्यामुळे चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर प्रत्यक्ष विदर्भात जाऊन, या एकल महिलांची भेट घेऊन, तेथील शेतकऱ्यांबरोबर राहात आम्ही पूर्वतयारी सुरू केली, असं छायाचित्रणकार सुरेश देशमाने यांनी सांगितलं. वर्षभर पूर्वतयारी, प्रत्येक ठिकाणी जाऊन चित्रीकरण स्थळ निश्चित करणं अशा बारीकसारीक गोष्टींवर भर देत त्यातलं वास्तव प्रेक्षकांना भिडेल अशा पद्धतीने चित्रीकरण केल्याची माहिती त्यांनी दिली.