करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये २१ दिवसाच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. १४ एप्रिलपर्यंत असणाऱ्या या लॉकडाउनचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. चित्रपट आणि मालिकांचे चित्रिकरणही थांबवण्यात आलं असल्याने अनेक कलाकार आपल्या घरीच आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. अनेक कलाकारांनी पंतप्रधान मोदींच्या आवहानाला सकारात्मक प्रतिसाद देत करोनाविरुद्ध लढण्यासाठी पीएम केअर्स या मदतनिधीसाठी निधीही दिला आहे. मात्र मुंबईमधील जोगेश्वरी येथे महानगरपालिकेच्या हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटरमध्ये चक्क एका अभिनेत्रीने रुग्णसेवा करण्यास सुरुवात केली आहे. अभिनेत्री शिखा मल्होत्रा हिने रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अभिनेत्रीचे कौतुक केलं आहे.
शिखाने २०१४ साली दिल्लीमधील सफदरजंग येथील वर्धमान महावीर मेडिकल कॉलेजमधून नर्सिंगचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण केल्यावर अभिनयाची आवड असल्याने शिखा मनोरंजन क्षेत्राकडे वळली.
शिखाने संजय मिश्रा यांच्यासोबतच्या ‘कांचली’ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट तिकीटबारीवर चांगली कामगिरी करु शकला नसला तरी समीक्षकांनी तिच्या अभिनयाचे कौतुकं केलं होतं.
करोनाच्या पार्श्वभूमीवर तिने जोगेश्वरीमधील महानगपालिकेच्या रुग्णालयामध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारपासून ती येथे रुजू झाली आहे. ‘नर्सिंगचे शिक्षण घेतल्यानंतर आम्ही समाजसेवेची शपथ घेतली होती. माझ्या मते हीच ती योग्य वेळ आहे समाजसेवा करण्याची,’ अशी प्रतिक्रिया आपल्या निर्णयाबद्दल बोलताना दिल्याचे, ‘व्हायरल भय्यानी’ या इन्स्ताग्राम अकाउंटवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
शिखानेही आपल्या इन्स्ताग्रामवर रुग्णालयामध्ये कामास सुरुवात केल्यासंदर्भातील पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने मी नर्सिंगचं शिक्षण घेतल्याने हे काम करण्याचा निर्णय घेतला आहे असं म्हटलं आहे. तसेच सर्वांनी घरीच थांबावे आणि या कठीण प्रसंगी सरकारच्या पाठीशी उभं रहावं असं आवाहन तिने या पोस्टमधून केलं आहे.
नक्की वाचा >> “रणवीर दिवसातले २० तास झोपलेला असतो, त्यामुळे…”; दीपिकाने सांगितली क्वारंटाइनची कथा
मी नर्स म्हणून काम करत असल्याचा मला अभिमान आहे असं सांगतानाच तिने सर्वांनी घरी राहणं आणि सुरक्षित राहणं महत्वाचं आहे असं आवाहन करणारा एक व्हिडिओही इन्स्ताग्रमावरुन शेअर केला आहे.
शिखाच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कौतुक केलं आहे. शिखा नर्स म्हणून रुजू झाल्याच्या वृत्तावर प्रितिक्रिया नोंदवताना मुख्यमंत्री कार्यलयाच्या ट्विटवर अकाऊंटवरुन शिखाची ही सेवा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. “शिखा जी, या कठीण काळात आपण करत असलेली रुग्णसेवा महाराष्ट्र राज्य कधीही विसरणार नाही. आपण करत असलेल्या कार्यासाठी शुभेच्छा आणि स्वतःची काळजी घ्या,” असं ट्विटमध्ये मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
एकीकडे अनेक कलाकार जनजागृतीचे आवाहन करत, आर्थिक मदत करत या संकटाच्या प्रसंगी आपला खारीचा वाटा उचलत असतानाच शिखाने थेट रुग्णसेवेचा घेतलेला निर्णय खरोखरच कौतुकास्पद असून मुख्यमंत्र्यांप्रमाणेच अनेक नेटकऱ्यांनीही तिचे कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.