‘फिजा’, ‘कंपनी’, ‘दम’ यांसारख्या चित्रपटांद्वारे ‘आयटम साँग’ आणि ‘आयटम गर्ल’ या दोन्ही संकल्पना बॉलिवूडमध्ये रुजविणारा नृत्य दिग्दर्शक गणेश हेगडे आता चित्रपट निर्मितीत उतरतोय. सिनेमातील गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन करणे, वाहिन्यांवरील विविध शोंचे नृत्य दिग्दर्शन करणे यात आता नावीन्य राहिलेले नाही. फिल्मी गाणी आणि नृत्य लोकांच्या फार काळ लक्षात राहील असे दिवस आता सरले आहेत. त्यामुळे नवे आणि वेगळे काही शोधण्याची गरज वाटू लागली होती. म्हणून  आता आपण निर्मिती क्षेत्रात उतरण्याचे ठरविले आहे, असे गणेश हेगडेने सांगितले. स्वत:च्या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली असून पहिल्या चित्रपटाच्या पटकथा लेखनाचे काम सध्या सुरू आहे, असेही त्याने म्हटलेय. अर्थात नृत्य दिग्दर्शक म्हणून गाजलेल्या गणेश हेगडेचा पहिला चित्रपट नृत्यावर आधारितच असणार आहे. विशेष म्हणजे नृत्यावर आधारित असल्यामुळे त्यातील प्रमुख भूमिका करणाऱ्या कलावंतांना मोठय़ा प्रमाणावर नृत्याविष्कार सादर करावे लागणार आहेत. त्यामुळे स्वत: गणेश हेगडेच प्रमुख भूमिका साकारण्याची शक्यता आहे.