संजय लीला भन्साळी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून कथानकाची भव्यता प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवतात. त्यांच्या चित्रपटांत पार्श्वसंगीतापासून ते अगदी त्यात सहभागी कलाकरांच्या भूमिकांपर्यंत प्रत्येक गोष्टीत बरेच बारकावे टीपलेले असतात. असेच बारकावे टिपत भन्साळी ‘पद्मावती’ या चित्रपटातून एक ऐतिहासिक कथानक प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. ‘पद्मावती’चा ट्रेलर आणि पहिलेवहिले गाणे सध्या प्रेक्षकांची दादही मिळवत आहे. हा चित्रपट म्हणजे एक स्वप्नवत प्रवासच आहे, याचा प्रत्यय ‘घुमर…’ या गाण्यातून येतोय.

राजपूत महिलांच्या धाडसी वृत्तीला सलाम करणारे हे गाणे सध्या ट्रेंडमध्येही आहे. तुम्हाला माहितीये का, दीपिका या गाण्यात ज्या तालावर थिरकताना दिसतेय, त्या लक्षवेधी नृत्यासाठी नृत्यदिग्दर्शिका कृती महेश मिद्या हिने बरीच मेहनत घेतली आहे. ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शो मधून कृतीने तिच्या नृत्यकौशल्याच्या माध्यमातून ‘डान्स गुरु’ रेमो डिसूजा याचे मन जिंकले होते. त्यानंतर कृतीच्या या कौशल्याला रेमोच्या पारखी नजरेने हेरले आणि तिला आपल्या डान्स ग्रुपमध्ये स्थान दिले. कृतीही तिच्या यशात रेमोचा सिंहाचा वाटा असल्याचे न चुकता सांगते. भन्साळींच्या ‘पद्मावती’ या चित्रपटामध्ये नृत्यदिग्दर्शन करण्याची संधी मिळालेली कृती फारच आनंदात असून, ‘घुमर…’चे नृत्यदिग्दर्शन करणे एक अविश्वसनीय अनुभव होता असं सांगते.

याविषयी ‘इनयुथ’ वेबसाइटला दिलेल्या माहितीत कृती म्हणाली, ‘घुमर हा एक पारंपारिक नृत्यप्रकार असल्यामुळे त्यात बरेच बारकावे टीपण्याची गरज होती. त्यातही राणी पद्मावती ही शाही घराण्यातील असल्यामुळे शाही घुमर आणि सर्वसामान्य घुमर यांमध्ये असणारा फरक हेरणेही तितकेच महत्त्वाचे होते. त्यासाठी आम्ही घुमरमध्ये निष्णांत असलेल्या ज्योती तोमर यांची मदत घेतली होती. या नृत्यप्रकारातील प्रत्येक मुद्रा, त्यातही त्या मुद्रा राणी करणार तेव्हा त्यात नेमकेपणा कसा असावा यावर भर देण्यात आला होता. या गाण्याला मिळत असलेल्या लोकप्रियतेसाठी दीपिकाची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे.’

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

‘घुमर…’चे चित्रीकरण करण्यासाठी जवळपास दहा दिवसांचा कालावधी लागला होता. त्याआधी पंधरा-सोळा दिवस यासाठीचा सरावही करण्यात आला होता. या साऱ्यामध्ये दीपिकाने मोठ्या समर्पक वृत्तीने या नृत्यप्रकारावर लक्ष केंद्रित केले होते. एखादी गोष्ट शिकताना ती त्यात स्वत:ला झोकून देते’, असेही कृतीने स्पष्ट केले. भन्साळींच्या ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटातील ‘नजर जो तेरी लागी मै दिवानी हो गई…’ या गाण्यासाठीसुद्धा कृतीनेच नृत्यदिग्दर्शन केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच स्टारकास्टसह आणि त्याच दिग्दर्शकांसह काम करण्याची संधी मिळणे ही बाब आपल्यासाठी फार मोठी असल्याचे कृतीने सांगितले. या गाण्यासाठी घेण्यात आलेली मेहनत पाहता, गाण्याची लोकप्रियता आणि त्याला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद हा कलाकारांसाठी फार सुखद असणार हे नक्की.