अभिनेता आमिर खानच्या आगामी ‘दंगल’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांची भूमिका साकारत आहे. सध्या आमिर ‘दंगल’च्या निमित्ताने चर्चेत आहे खरा, पण, त्यामागचे कारण थोडे वेगळे आहे. कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांची मोठी मुलगी आणि कुस्तीपटू गीता फोगट ही लवकरच विवाहबद्ध होणार आहे.
आमिर खान तिच्या लग्नाला हजेरी लावणार असल्यामुळे गीताचा आनंद द्विगुणित झाला आहे. ‘दंगल’ या चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारीसुद्धा आमिरसह गीताच्या विवाहसोहळ्यात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. २० नोव्हेंबरला पवन कुमारसोबत गीता विवाहबद्ध होणार आहे. गीताच्या लग्नासाठी आमिर तिला एक खास भेटही देणार आहे. लग्नामध्ये अतिशय महत्त्व असणारे लग्नाचे कपडे अर्थात (शादीका जोडा) आमिर गीताला भेट देऊ इच्छित आहे.
‘दंगल’ या चित्रपटाच्या निमित्ताने आमिरची गीता आणि बबिता यांच्यासोबत आणि महावीर सिंग फोगट यांच्यासोबत चांगलीच ओळख झाली आहे. त्यामुळे या नात्यांचा मान ठेवत आमिर गीताच्या लग्नाला जाणार आहे. सध्या गीताच्या लग्नाची सर्व तयारी झाली असून सर्वांनाच लग्नाच्या दिवसाची उत्सुकता लागून राहिली आहे. कारण मुलीच्या वडिलांकडून तिला लग्नात घालायचे कपडे दिले जातात. अशातच आमिर गीताला ही खास भेट देणार असल्यामुळे सध्या त्याच्याच आणि गीतामध्ये वडिल-मुलीच्या नात्याप्रमाणेच एक भावनिक नाते तयार झाले आहे असेच दिसतेय.
‘दंगल’ या चित्रपटामध्ये आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेत झळकणार आहे. महत्त्वाकांक्षी वडिलांची त्यांच्या मुलींना प्रोत्साहन देण्याची सत्य कथा या चित्रपटात साकारण्यात आली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रसिकांना आमिर खान विविध रुपांमध्ये दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्याने घेतलेली मेहनत सर्वांच्याच नजरेस पडत आहे. आमिरसोबतच अभिनेत्री साक्षी तन्वर या चित्रपटामध्ये महावीर सिंग फोगट यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. तर, फातिमा सना शेख ही ‘गीता फोगट’च्या आणि सनाया मल्होत्रा ‘बबिता कुमारी’च्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘म्हारी छोरिया छोरोसे कम है के?’, असे म्हणणारा आमिर खान या चित्रपटाद्वारे २३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.