रजनीकांत म्हणजे सुपरहिट चित्रपटाची गॅरंटी, असं म्हटलं जायचं. परंतु गेल्या काही वर्षात रजनीकांत यांच्या स्टारडमला उतरती कळा लागली आहे. ‘दरबार’ हे याचे ताजे उदाहरण. जानेवारीत प्रदर्शित झालेला ‘दरबार’ रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील सर्वात फ्लॉप ठरला आहे.

हा चित्रपट गुंतवलेले पैसेही परत मिळवू शकला नाही. परिणामी आता गुंतवणूकदारांनी दिग्दर्शक ए. आर. मुरुगादोसा यांच्याकडे गुंतवलेले पैसे मागण्यास सुरुवात केली आहे. या गुंतवणूकदारांकडून बचाव करण्यासाठी मुरुगादोसा यांनी मद्रास उच्चन्यायालयात धाव घेतली. त्यांनी न्यायालयात पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

गुंतवणूकदार रजनीकांत यांच्या चित्रपटांवर वाट्टेल तीतका खर्च करतात. कारण गुंतवलेला पैसा त्यांना दुप्पट तिप्पट दराने परत मिळतो. परंतु सध्या रजनीकांत यांचे चित्रपट अपेक्षित कमाई करताना दिसत नाहीत.

त्यांचा ‘दरबार’ हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला आहे. परिणामी गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आणि नुकसान भरुन काढण्यासाठी आता ते दिग्दर्शक मुरुगादोसा यांच्याकडे पैसे मागत आहेत. दरम्यान त्यांच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या दिग्दर्शक ए.आर. मुरुगादोसा यांनी उच्च न्यायालयात धाव घेत आपल्याला संरक्षण मिळावं अशी मागणी केली आहे.