बॉलिवूडनंतर हॉलिवूडमधील अभिनयाने चर्चेत असलेली दीपिका पदुकोण निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. त्यानंतर दीपिका हॉलिवूडच्या अॅक्शनपट चित्रपटाने आपल्या निर्मितीचा श्री गणेशा करणार असे म्हटले जात होते. एका हॉलीवूड चित्रपटाचा रिमेक आता हिंदीत येत असून त्याची निर्मिती चक्क दीपिका करणार असल्याचे आता समजतेय.
बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटविणीरी दीपिका हॉलिवूडमधील कोणत्या चित्रपटाला हिंदीमध्ये घेऊन येईल याची उत्सुकता दीपिकाच्या चाहत्यांसह बॉलिवूडमध्ये लागून राहिली आहे. दीपिका आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीचा अॅक्शनपट ‘लारा क्रॉफ्ट’ या चित्रपटाचा रिमेक करणार असल्याची चर्चा बॉलिवूड वर्तुळात रंगली आहे. दीपिका सध्या हॉलिवूडमधील चित्रपट हिंदीमध्ये तयार करण्यासाठीच्या संहितेबाबत नियोजन करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. या संदर्भात ती लवकरच घोषणा देखील करणार असल्याचे समजते.
दीपिका सध्या आपल्या आगामी पद्मावती चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. संजल लीला भन्साळी दिग्दर्शित‘पद्मावती’ या चित्रपटात दीपिकाची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. दीपिका या चित्रपटात राजपूत राणी ‘पद्मावती’ची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता शाहिद कपूर राजा रतन सिंगच्या भूमिकेत झळकणार आहे. भन्साळींच्या चित्रपटातून बऱ्याचदा प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता रणवीर सिंग या चित्रपटामध्ये अलाउद्दिन खिलजीच्या रुपात दिसेल.
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी दीपिका हॉलीवूडचा सुपरस्टार विन डिझेलसोबत ‘xXx द रिटर्न ऑफ झेन्डर केज’ या हॉलीवूडपटात दिसणार आहे. दीपिकाने या चित्रपटासाठी भरपूर मेहनत घेतली असून सेलिब्रेटी ट्रेनर यास्मीन कराचीवालाकडे ट्रेनिंग घेतले आहे. ‘xXx’ चित्रपटात दीपिका सरेनाची भूमिका साकारत आहे. दीपिकाने यापूर्वी बॉलिवूडमधील ‘चांदनी चौक टू चायना’ या चित्रपटात अॅक्शन दृश्ये दिली होती. त्यानंतर आता ती विन डिझेलसोबत ‘xXx द रिटर्न ऑफ झेन्डर केज’ या चित्रपटामध्ये अॅक्शन दृश्ये करताना दिसेल.