बॉलिवूड मस्तानी दीपिका पदुकोन सध्या तिच्या पहिल्या वहिल्या हॉलिवूडपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. ‘ट्रिपल एक्स द झेंडर केज’ या चित्रपटाचा ती सध्या सातासमुद्रापलिकडे प्रचार करताना दिसते. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी दीपिका हॉलिविडच्या चॅटशोमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. ‘द एलेन डीजेनरेस शो’ या कार्यक्रमातून ती आपल्या आगामी चित्रपटाची प्रसिद्ध करताना दिसल्यास नवल वाटू नये. या शोमध्ये हॉलिवूडमधील दिग्गज मंडळी सहभागी होत असतात. त्यामुळे दीपिकाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होणे हे तिच्यासाठी हॉलिवूडपट चित्रपटगृहामध्ये येण्यापूर्वी आणखी एक यशस्वी पाऊलच ठरेल. यापूर्वी देसी गर्ल प्रियांका चोप्रा या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती.

दरम्यान, दीपिकाचा पहिला हॉलिवूडपट भारतामध्ये १४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. काहीदिवसांपूर्वीच दीपिकाने आपल्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरुन तिचा सहकारी १२ आणि १३ जानेवारीला भारतामध्ये येणार असल्याचे सांगितले होते. दीपिकाच्या अभिनयाने घायाळ झालेला हॉलिवू़ड स्टार भारतामध्ये चित्रपटाच्या प्रसिद्धी करेल.यात शंका नाही. पण बॉलिवूड वर्तूळात रंगलेल्या चर्चेनुसार, विन डिझेल आणि दीपिका भारतामध्य़े चित्रपटाची प्रसिध्दी करण्यासाठी बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरसोबत कॉफी घेताना दिसणार आहेत. दीपिकाने हॉलिवू़ड चॅटशोतून चित्रपटाची प्रसिद्धीसाठी गेल्यानंतर विन डिझेलला भारतातील चॅटशोमध्ये पाहणे दीपिकाच्या चाहत्यांसाठी आणि बॉलिवूड वर्तूळासाठी एक वेगळी उपलब्धी ठरले. या वृत्ताची जोरदार चर्चा असली तरी दीपिका पदुकोन किंवा चित्रपटाच्या टीमकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

यापूर्वी दीपिकाने ‘बिग बॉस’च्या घरात सलमानच्या साक्षीने आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले होते. त्यामुळे भारतामध्ये विन डिझेलच्या साथीने ती चित्रपटाची प्रसिद्ध करताना कोणत्या मार्गाचा अवलंब करणार याची तिच्या चाहत्यांना नक्कीच उत्सुकता असेल. ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या हॉलिवूडपटामुळे अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या चांगलीच चर्चेत आहे. २०१६ च्या वर्षाअखेर म्हजेच ३१ डिसेंबरला ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ चा हिंदी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरला यूट्यूबवर चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसले होते. संजल लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनात बनणाऱ्या ‘पद्मावती’ या चित्रपटात देखील दीपिका मह्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. एका ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत अभिनेता रणवीर सिंग, शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.