सध्या संपूर्ण देश लॉकडाउन असताना प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी छोट्या पडद्यावरील ८० आणि ९०च्या दशकातील सर्व मालिका पुन्हा दाखवण्यात येत आहेत. या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘देख भाई देख.’ ही मालिका दररोज संध्याकाळी ६ वाजता पुन्हा दाखवण्यात येत आहे. पण या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेते शेखर सुमन यांच्या मुलाचे निधन झाले होते.
नुकताच शेखर सुमन यांनी ‘स्पॉटबॉय’ या वेब साइटला मुलाखत दिली. दरम्यान त्यांनी ‘देख भाई देख’ मालिकेच्या सेटवरील आठवणींना उजाळा दिला आहे. सुरुवातीली शेखर सुमन यांना मालिकांमध्ये काम करायचे नव्हते पण या मालिकेची निर्मिती जया बच्चन यांनी केल्यामुळे शेखर सुमन यांनी काम करण्यास होकार दिला होता. तसेच शेखर यांची त्यावेळी आर्थिक परिस्थिती देखील बिकट होती.
‘देख भाई देख ही मालिका माझ्या हृदयाच्या जवळ आहे. कारण या मालिकेचे चित्रीकरण सुरु असताना माझा मोठा मुलगा आयुष आजारी झाला आणि आजारपणात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मला मालिकेत काम करण्याची इच्छा नव्हती. पण मी म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे पैसे फार कमी होते आणि हॉस्पिटलची बिले इतकी जास्त होती की माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता’ असे शेखर यांनी म्हटले आहे.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
देख भाई देख या मालिकेची निर्मीती जया बच्चन यांनी केली होती. छोटा पडदा जेव्हा नवा होता तेव्हाच जया बच्चन यांनी त्यात रस घेऊन ‘देख भाई देख’सारख्या धम्माल कौटुंबिक विनोदी मालिकेची निर्मिती केली होती. या मालिकेमध्ये अभिनेते शेखर सुमन, नवीन, फरीदा जलाल, भावना बलसावर, देवेन भोजानी, सुषमा सेठ, विशाल सिंग, नताशा सिंह या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. हा शो ६ मे १९९३ साली डीडी मेट्रोवर प्रदर्शित झाला होता. त्यावेळी शोने ६५ एपिसोड पूर्ण केले होते.