जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘धडक’ चित्रपटाने पहिल्या आठवड्यात चांगली कमाई केली असून ३३.६७ कोटींचा गल्ला जमवला आहे. २० जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धडक’च्या कमाईची गाडी बॉक्स ऑफीसवर सुसाट पळताना दिसत आहे.

प्रदर्शनाच्या दिवशी ‘स्टुडंट ऑफ द इयर’चा विक्रम मोडत या चित्रपटाने ८.७१ कोटी कमावले. तर शनिवारी ११.०४ कोटी आणि रविवारी १३.९२ कोटी मिळून एकूण ३३.६७ कोटींची कमाई ‘धडक’ने केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ही माहिती दिली आहे. हा आकडा पाहता येत्या काळात ‘सैराट’चा हा हिंदी रिमेक चांगला गल्ला जमवू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ‘धडक’चा ट्रेलर, गाणी प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून नकारात्मक प्रतिसाद जास्त आला. पण, बॉक्स ऑफिसवर मात्र या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

वाचा : बँक कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्याप्रकरणी बिग बींची ती जाहिरात घेतली मागे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जगभरातील २ हजार ७९१ स्क्रिन्सवर शशांक खैतान दिग्दर्शित ‘धडक’ प्रदर्शित झाला. त्यापैकी २ हजार २३५ स्क्रिन्स हे भारतातील आहेत. नवोदित कलाकार असूनही या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरातही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं आंतरराष्ट्रीय पातळीवर साडेतीन कोटींहून अधिकची कमाई केली आहे.