‘धनगरवाडा’ या अगामी मराठी चित्रपटात महाराष्ट्रातील डंगे धनगर समाजाचे जगण्याचे वास्तव दर्शविण्यात आले आहे. कथालेखक विजयकुमार दळवी यांच्या ‘धनगरवाडा’ या गाजलेल्या कादंबरीवर हा चित्रपट आधारीत आहे. अडीचशेहून अधिक चित्रपटांचं छायांकन केलेले ख्यातनाम सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांनी धनगरवाडाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पहिलं पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चंदगड तालुक्यातील उंच डोंगरमाथ्यावर घनदाट जंगलात वसलेल्या एका धनगरपाड्यावर या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आले. त्यामुळे चित्रपटाला लाभलेला एक वेगळाच नैसर्गिक ताजेपणा डोळ्यांना नक्कीच सुखावेल, असं समीर आठल्ये यांनी सांगितले. धनगरवाडाच्या माध्यमातून त्यांनी धनगर समाजाच्या समस्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्येष्ठ अभिनेते स्व. सदाशिव अमरापूरकर यांनी ‘झिमू’ या जातपंचायतीच्या प्रमुखाची भूमिका चित्रपटात साकारली आहे. सदाशिव अमरापुरकर यांच्यासोबत वरद विजय चव्हाण, पल्लवी पाटील, मिलिंद गवळी, गणेश यादव, माधव अभ्यंकर, सुहासिनी देशपांडे, पूजा पवार, जयवंत वाडकर आणि गणेश आगलावे यांच्या प्रमुख भूमिका आहे. गीतकार बाबा चव्हाण यांची मधूर गीतरचना आणि पटकथा-संवाद अनिल सपकाळ यांनी लिहिले आहेत. अलका कुबल-आठल्ये, शिल्पा मसुरकर प्रस्तुत आणि विजयकुमार दळवी – प्रकाश मसुरकर निर्मित धनगरवाडा हा चित्रपट २७ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. पुढे वर्षभर महाराष्ट्रात आणि सीमाभागातील धनगर समाजाच्या जवळपास सव्वाशे जत्रांमध्ये चित्रपट दाखवला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाहा चित्रपटाचा ट्रेलर:

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhangarwada marathi movie
First published on: 17-11-2015 at 13:01 IST