ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र बुधवारी पहाटे त्यांचं निधन झालं.

हिंदी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज निधन झालं. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी (७ जुलै २०२१ रोजी) सकाळी साडेसात वाजता हिंदूजा रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणावस्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजामध्ये दाखल करण्यात आलं होतं. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

चित्रपट सृष्टीमधील महान व्यक्ती म्हणून दिलीप कुमार यांची कायम आठवण काढली जाईल. चित्रपटांमध्ये वावरताना त्यांचं तेज अतुलनीय होतं. त्यामुळेच त्यांनी अनेक पिढ्यांमधील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. दिलीप कुमार यांचं निधन हे आपल्यासाठी एक सांस्कृतिक नुकसान आहे. माझ्या सद्भावना त्यांच्या कुटुंबियाबरोबर, मित्रांबरोबर आणि असंख्य प्रशंसकांसोबत आहेत, देव त्यांच्या आत्मास शांती देवो, असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही दिलीप कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. एक मोठा अभिनेता आपल्यातून निघून गेल्याबद्दल नायडू यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही दिलीप कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. माझ्या सद्भावना दिलीप कुमार यांचे कुटुंबिय, मित्र परिवार, चाहत्यांसोबत आहेत. पुढील अनेक पिढ्यांमध्ये त्यांनी भारतीय सिनेमासाठी दिलेलं योगदान लक्षात ठेवलं जाईल, असं राहुल यांनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही दिलीप कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केलीय.

दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने जून महिन्यात रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. यावेळी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटोदेखील शेअर करत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती. उपचारानंतर पाच दिवसांनी दिलीप कुमार यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिलीप कुमार यांनी ‘ज्वार भाटा’ या सिनेमातून १९४४ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःख दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयातून उतरवलं आणि पुढची अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. ‘बाबूल’, ‘दीदार’ ‘आन’ ‘गंगा-जमुना’, ‘मधुमती’, ‘देवदास’ अशा कितीतरी सिनेमांची नावे या यादीत घेता येतील. १९९८ मध्ये आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.