जत्रेत हरवलेले तीन भाऊ, भूकंप किंवा तत्सम संकटात वेगळे झालेले त्यांचे आई-वडील आणि मग या तीन मुलांच्या नायिका, त्यांच्या प्रेमकथा, या तिन्ही भावांना एकत्र आणणारे योगायोग आणि मग सरतेशेवटी या सगळय़ा जत्रेतील माणसांना एकत्र आणत केलेली ‘समाप्त’ची आनंदी घोषणा. सत्तर-ऐंशीच्या दशकात निर्माते- दिग्दर्शक मनमोहन देसाईंनी केलेले असे कित्येक बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांनी आवडीने पाहिले आणि डोक्यावरही घेतले. बिनडोक मनोरंजन या लेबलखाली हरवलेल्या या शैलीतील कथेला पुन्हा पडद्यावर आणणाऱ्या ‘दिल दिमाग और बत्ती’ या चित्रपटात अभिनेता दिलीप प्रभावळकर यांनी मोहन देसाई नामक व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटात त्यांच्या वेगवेगळय़ा भूमिका आणि लुक्स असून त्यांच्या पत्नीची भूमिका वंदना गुप्ते यांनी केली आहे. खटय़ाळ सासू, प्रेमळ आई अशा अनेक छटा रंगवणाऱ्या वंदना गुप्तेही पहिल्यांदाच एका वेगळय़ा भूमिकेतून लोकांसमोर येणार आहेत.
लेखक हृषीकेश गुप्ते यांचे दिग्दर्शनातील पदार्पण असलेल्या ‘दिल दिमाग और बत्ती’ या चित्रपटात मनमोहन देसाई आणि त्यांच्या शैलीदार चित्रपटांना सलाम करण्यात आला आहे, अशी माहिती दिलीप प्रभावळकर यांनी दिली. या चित्रपटात त्यांच्या वेगवेगळय़ा व्यक्तिरेखा आहेत. ‘हा चित्रपट एक वेगळाच अनुभव आहे. सत्तर-ऐंशीच्या दशकातील चित्रपटांचा फिल्मी फॉम्र्युला या चित्रपटात पाहायला मिळतो; पण म्हणजे फक्त त्या पद्धतीचे कथानक यात दाखवण्यात आलेले नाही. तर अंतर्गोल आणि बहिर्गोल भिंगातून एखादी गोष्ट पाहिल्यावर ती कशी दिसेल तसा हा चित्रपट आहे. अतिशय रंजक आणि अॅक्शनने भरपूर असा चित्रपट आहे,’ असं प्रभावळकर यांनी सांगितलं. या चित्रपटात दिल – दिमाग असे दोघे भाऊ आणि बत्ती नावाची त्यांची बहीण यांची कथा आहे. मनमोहन देसाईंचे त्या वेळचे फॉम्र्युलापट आणि त्यातल्या व्यक्तिरेखा या रंजक असायच्या. डोळसपणे चित्रपट पाहणाऱ्याला ते पटलं नाही तरी चित्रपट मनोरंजक असायचे आणि हिट व्हायचे. तशा पद्धतीच्या रंजक प्रतिमा आणि अत्यंत योगायोग, ताटातूट असं सगळं कथानक या चित्रपटात आहे. अशा पद्धतीच्या चित्रपटात मी आजवर काम केलं नव्हतं. एक कलाकार म्हणून हा त्यातली ही अतिशयोक्ती- अतिरंजकतेची जी गंमत आहे ती अनुभवावी असं वाटल्याने मी ही भूमिका केली, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आमची जोडी धर्मेद्र-हेमामालिनीची..
वंदना आणि मी खूप चित्रपट- नाटकांमधून एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळे आम्ही दोघंही गमतीने म्हणतो की, आमची जोडी ही धर्मेद्र आणि हेमामालिनीसारखी आहे. फक्त आमच्यात धर्मेद्र कोण आणि हेमामालिनी कोण हे आम्ही त्या त्या वेळेनुसार ठरवतो, असं ते मिश्कीलपणे सांगतात. जयवंत दळवींचं ‘संध्याछाया’ हे नाटक जेव्हा पुन्हा नव्या संचात रंगभूमीवर आलं तेव्हा त्या नाटकात आम्ही दोघांनी काम केलं होतं. ‘नांदा सौख्य भरे’ नावाचं नाटक केलं होतं, तेव्हापासून ते अगदी अलीकडे ‘फॅमिली कट्टा’, ‘मर्डर मिस्ट्री’, ‘होऊन जाऊ द्या’ अशा किती तरी चित्रपटांतून मी आणि वंदनाने एकत्र काम केलेलं आहे. या चित्रपटाचं वैशिष्टय़ म्हणजे किशोर, सोनाली, पुष्कर ते अगदी संस्कृती, सखी गोखले, पुष्कराज, सागर संत अशा नव्या-जुन्या कलाकारांनी एकत्र येऊन काम केलं आहे. तीन पिढय़ांच्या कलाकारांची ऊर्जा या चित्रपटात उत्तम जमून आली आहे, असं प्रभावळकर सांगतात.
अभिनेत्री वंदना गुप्ते यांना याआधी कधीही न पाहिलेल्या अशा भूमिकेत पाहण्याची संधी या चित्रपटाने दिली आहे. दिलीप प्रभावळकर आणि वंदना गुप्ते यांनी या चित्रपटात एका गाण्यावर नृत्यही केलं आहे. ‘मला पडद्यावर नाचायला – बागडायला नेहमीच आवडतं, पण खरोखरच तशा पद्धतीची भूमिका पडद्यावर मी पहिल्यांदाच केली आहे आणि या वयात अशी भूमिका मिळाली म्हणजे आनंदच. अशी भूमिका तरुण असतानाच्या काळात मिळाली असती तर मी काय काय केलं असतं असं वाटायला लावणारी ही भूमिका आहे,’ अशी भावना वंदना गुप्ते यांनी व्यक्त केली. बाकी मला कोणाच्या तालावर नाचता येत नाही. त्यामुळे इथेही नृत्य करत असताना अखेर नृत्य दिग्दर्शक उमेश जाधवने मला हवं तसं नृत्य करण्याचं स्वातंत्र्य देऊन टाकलं, असंही त्यांनी गमतीने सांगितलं.
खरं तर या चित्रपटाची कथा हृषीकेश गुप्ते यांनी ऐकवली तेव्हा हृषीकेशसारख्या लेखकाला या अशा फिल्मी सिनेमाचं स्वप्न कसं काय पडू शकतं, असं मला वाटलं. कल्पना भन्नाट असली तरी हे प्रत्यक्षात साकारता येईल, याबद्दल मी साशंकच होते; पण प्रत्यक्षात पडद्यावर हा चित्रपट पाहताना मला स्वत:ला खूप मजा आली, असं त्यांनी सांगितलं. मनमोहन देसाईंचे चित्रपट पाहात पाहात आम्ही मोठे झालो. आज त्याच पद्धतीचा चित्रपट करताना आणि स्वत:ला त्या भूमिकेत पाहताना मजा आली, असं त्या म्हणतात.