अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांचे मत

पुणे : अभिनय करताना केवळ स्वत:च्या कामावर लक्ष दिले जाते. मात्र, दिग्दर्शन करताना आपल्याबरोबर तांत्रिक काम करणाऱ्या सर्वाबरोबर आपल्याला जुळवून घ्यावे लागते. त्यामुळे अभिनयापेक्षा दिग्दर्शन अधिक महत्त्वाचे असते, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

महिला पत्रकारांचा आयाम गट, आशय फिल्म क्लब आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे आयोजित ‘तिच्या नजरेतून सिनेमा’ या चित्रपट महोत्सवाचा समारोप सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित ‘वेलकम होम’ चित्रपटाने झाला. या चित्रपटातील अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, बालकलाकार प्रांजली श्रीकांत आणि डॉ. मोहन आगाशे या कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. आयाम गटाच्या मनस्विनी प्रभुणे, नम्रता फडणीस, प्राची बारी, मेघा शिंपी, स्वाती जरांडे, अपर्णा देगांवकर, आशयचे सतीश जकातदार या वेळी उपस्थित होते.

मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, सुमित्रा भावे यांच्या कथेतील साधेपण, संवाद आणि प्रामाणिकपणे प्रश्न मांडण्याची पद्धत भावते. त्यांच्या सोबत काम करणे हा एक वेगळा अनुभव असतो. आपल्यामधील अनेक वेगळ्या गुणांची ओळख कलाकाराला त्यांच्या चित्रपटात काम करताना होत असते.

नवरा-बायको या नात्यामधील क्लिष्टता, अनेकविध पदर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला असून त्यातून प्रत्येकाने आपापले उत्तर शोधणे अपेक्षित असल्याचे मत डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.