अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनं XXX: Return of Xander Cage या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील दीपिकाच्या अभिनयाचं सगळ्यांनीच कौतुक केलं. आता या चित्रपटाचा चौथा भाग लवकरच प्रदर्शित होत आहे आणि पुढील भागातदेखील दीपिका पादुकोणची महत्त्वाची भूमिका असणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक डिजे कॅरोसो यांनी नुकतीच या चित्रपटाच्या पुढील भागाची घोषणा केली आहे. ट्विटरवर त्यांनी एका चिनी गायकाचं झँडर केजच्या कुटुंबात स्वागत केलं. यावेळी चाहत्यांनी कॅरोसो यांना दीपिकाबद्दलही प्रश्न विचारला. चित्रपटाच्या पुढील भागात दीपिका दिसणार का असा प्रश्न? ट्विटरवर चाहत्यांनी कॅरोसोला विचारला आणि याचं सकारात्मक उत्तर कॅरोसोनं दिलं आहे.
सध्या पुढील भागाच्या कथानकावर काम सुरू आहे. ते पूर्ण झालं की चित्रिकरणाला सुरूवात होईल अशी माहिती कॅरोसो यांनी दिली. दीपिका अभिनेता रणवीर सिंग सोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. २० नोव्हेंबरला हे जोडपं इटलीत लग्न करणार आहे. दीपिकानं नोव्हेंबरपर्यंत कोणतंही शूट किंवा चित्रपट न करण्याचं ठरवलं आहे. XXX रिटर्न ऑफ झँडर केजच्या पुढील भागासाठी आता दीपिका होकार देते की नाही पाहण्यासारखं ठरेल.